Depression increases suicides in the state! | राज्यात नैराश्यातून वाढले आत्महत्येचे प्रमाण!

राज्यात नैराश्यातून वाढले आत्महत्येचे प्रमाण!

अकोला : महाराष्ट्रात आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे वास्तव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नॅशनल हेल्थ प्रोफाईल- २०१९ च्या माध्यमातून समोर आले आहे. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली, तरी नैराश्य हे मोठं कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे.
राज्यात शेतकऱ्यांसोबतच तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. आत्महत्येची कारणं वेगवेगळी असली, तरी यातील बहुतांश आत्महत्येचे प्रकार हे नैराश्यातून घडल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या ‘नॅशनल हेल्थ प्रोफाईल-२०१९’मध्ये देशभरातील आत्महत्येचे गंभीर चित्र स्पष्ट केले आहे. अहवालात २०१५ नुसार दिलेल्या राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्रात महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पुरुषांची संख्या १२, ६५४, तर ४,३१४ महिला आहेत. यामध्ये ३० ते ४५ वर्षे वयोगटात ४, ६४८ पुरुषांनी, तर १८ ते ३० वर्षे वयोगटातील ३५५९ तरुणांनी आत्महत्या केली आहे.

वयोगटानुसार आत्महत्या

वयोगट            पुरुष           महिला
१८ ते ३० -       ३५५९ -      १८३१
३० ते ४५ -       ४६४८ -     १२३१

आत्महत्या करण्यामागे प्रमुख कारण म्हणजे नैराश्य असते. नैराश्यात असलेल्या रुग्णांमध्ये आत्महत्या करण्याची लक्षणे जास्त असतात. या व्यतिरिक्त दारूचे सेवन आणि इतर सामाजिक समस्यांमुळेही आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण आहे; परंतु नैराश्यातून आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेष म्हणजे २० ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तिंमध्ये आत्महत्येचे विचार जास्त येतात. या व्यक्तींना समुपदेशनाची गरज असते. प्रेरणा प्रकल्पांतर्गत अशा व्यक्तिंचे सुमपदेशन केले जाते.
- डॉ. श्रीकांत वानखडे, मानसोपचार तज्ज्ञ, प्रेरणा प्रकल्प, अकोला.

 

Web Title: Depression increases suicides in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.