निराधार महिलेला गणेशाचा आधार!
By Admin | Updated: July 26, 2016 01:58 IST2016-07-26T01:58:50+5:302016-07-26T01:58:50+5:30
संघर्षगाथा: गणेशमूर्ती निर्मितीतून लावतेय घराला हातभार

निराधार महिलेला गणेशाचा आधार!
अकोला: लाडक्या गणरायाचे आगमन महिनाभरावर येऊन ठेपले आहे. गणेश मूर्ती निर्मितीच्या कामाला वेग आला आहे. गणेश मूर्ती निर्मिती आणि विक्रीतून शेकडो हातांना रोजगार मिळतो. अनेकांना बाप्पाने आधार दिला. असाच आधार अकोल्यातील निराधार महिलेला मिळालेला आहे. गणेश मूर्ती निर्मितीतून ती घरासोबतच मुलीच्या शिक्षणाला हातभार लावत आहे.
अकोल्यातील वसंत देसाई क्रीडांगणासमोरील जागेत लता सुरेश श्रृंगारे या महिलेने झोपडी थाटून गणेश मूर्तीच्या निर्मिती कामाला सुरुवात केली. गणेश मूर्ती निर्मितीचा लताबाईंचा पिढीजात व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या भरवशावरच तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. चार वर्षांपूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे लताबाई खचली. मुलीचे शिक्षण कसे करावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. पतीसोबत ती गणेश मूर्ती निर्मितीच्या कामात मदत करायची. गणेश मूर्ती घडविण्याचे कौशल्य तिला पतीने शिकविले होते.
या कौशल्याचा आधार घेत, लताबाईने नव्या उमेदीने गणेश, शारदा, मूर्ती घडविण्याचे कार्य हाती घेतले. बाजारातून प्लास्टर, कलर, डिस्टेम्बर आणून तिने मूर्ती घडवायला सुरुवात केली. तिची लहान मुलगी सध्या इयत्ता दहावीला शिकते आहे. तीही लताबाईला या कामात मदत करते. मोठय़ा मुलीचे लग्न झाले. दोघी मायलेकी झोपडीवजा घरात राहतात. गणेश मूर्ती निर्मितीतून लताबाई मुलीला शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. तिने शेकडो गणेश मूर्ती घडविल्या. सध्या गणेश मूर्तींना आकार देण्याचे, रंगरंगोटी करण्याचे काम ती करीत आहे. अवघ्या महिनाभरावर गणरायाचे आगमन येऊन ठेपले. त्यापूर्वी आकर्षक गणेश मूर्ती तयार करून त्या बाजारात पाठविण्यासाठी लताबाईची धडपड सुरू आहे. गणेश मूर्ती निर्मितीचे साहित्य महागल्याने यंदा गणेश मूर्तींंच्या किमतीतही वाढ होणार असल्याचे लताबाईने सांगितले. गणेश मूर्ती घडविण्याच्या कौशल्यामुळे आणि सण-उत्सवामुळे निराधार महिलेला आधार मिळतो आहे. लताबाईचा सुरू असलेला संघर्ष, मुलीला शिकविण्याची धडपड प्रेरणादायी आहे.