मातीच्या पणत्यांची मागणी घटली!
By Admin | Updated: October 21, 2014 23:03 IST2014-10-21T23:03:44+5:302014-10-21T23:03:44+5:30
टेराकोटाच्या पणत्यांकडे ग्राहकांचा कल; परराज्यातील पणत्यांची कुंभारांकडून विक्री.

मातीच्या पणत्यांची मागणी घटली!
वाशिम: दिपोत्सवात मातीच्या पणत्यांना महत्वाचे स्थान असते. काळाच्या ओघात या पणत्यांचे महत्व ओसरले आहे. मातीच्या पणत्यांची मागणी कमी होत असल्याने, पणत्या बनविणार्या कुंभारांची संख्याही कमी होत आहे. पश्चिम वर्हाडातील कुंभार आता पणत्या स्वत: बनविण्याऐवजी परराज्यातील व्यापार्यांकडून तयार पणत्या घेऊन, त्या विकण्याच्या व्यवसायाकडे वळले आहेत.
दिवाळीनिमित्त पणत्या, महालक्ष्मीच्या मुर्त्या, मापलं, खेळभांडी तयार करण्याचे काम कुंभार करतात. कुंभार समाजाच्या या परंपरागत व्यवसायावर हळूहळू कोलकाताच्या व्यापार्यांनी अतिक्रमण केले. आता काही मोजके कुंभार वगळता, बहुतेकांनी पणत्या बनविणे बंद केले आहे. कोलकाता येथील टेराकोटाच्या पणत्या बाजारात येण्यापूर्वी एक कुंभार जवळपास ५0 हजार पणत्या बनवायचा. आता हे कुंभार कोलकाताच्या व्यापार्यांकडून ५00 रूपये प्रति हजार या भावाने टेराकोटाच्या पणत्या विकत घेतात. नंतर याच पणत्या ते बाजारपेठेत ९00 रूपये प्रति हजार या भावाने विकतात.
कुंभारांनी हाताने घडविलेल्या पणत्यांपेक्षा टेराकोटाच्या पणत्या आकर्षक असतात. त्यामुळे या पणत्यांना जास्त मागणी असते. त्यामुळे कुंभार तयार पणत्या विकण्याच्या व्यवसायाकडे मोठय़ा प्रमाणात वळले आहेत.
टेराकोटाच्या पणत्या आम्ही बनविलेल्या पणत्यांपेक्षा जास्त आकर्षक असतात. त्यामुळे मातीच्या पणत्या ग्राहक खरेदी करणे सहसा टाळतात. त्यामुळे आम्ही कोलकाताच्या व्यापार्यांकडून थोक भावात पणत्या विकत घेऊन, त्यांची किरकोळ विक्री करतो, असे वाशिम येथील कुंभारगल्लीतील एका कुंभाराने सांगितले.