अकोला जिल्ह्यात माता मृत्यूच्या दरात घट!
By Admin | Updated: July 10, 2014 01:29 IST2014-07-10T01:19:03+5:302014-07-10T01:29:06+5:30
अकोला आरोग्य विभागाच्या योजनांचे सकारात्मक परिणाम

अकोला जिल्ह्यात माता मृत्यूच्या दरात घट!
अकोला- प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू होण्याचे प्रमाण जिल्हय़ात घटले आहे. मागील तीन वर्षात माता मृत्यूचे प्रमाण एक लाख महिलांमागे १0८ वरून ९५ वर आले आहे. जननीसुरक्षा योजनेंतर्गत प्रसूती दवाखाण्यातच करण्यासाठी आरोग्य विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे माता मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.
अकोला जिल्हय़ात ग्रामीण भागामध्ये आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ३0 प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यात जननीसुरक्षा योजना, जननी-शिशु सुरक्षा योजना यासारख्या माता आणि नवजात बालकांबाबत राबविण्यात येणार्या योजनांचा समावेश आहे. प्रसूती आरोग्य केंद्रातच व्हावी, यासाठी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत योजना राबविताना माता आणि नवजात शिशूच्या उपचारासाठी भत्ता दिला जातो. त्यामुळेही आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. परिणामस्वरूप जिल्ह्यात माता मृत्यूचा दर घसरला आहे. दर एक लाख महिलांमागे जिल्ह्यात माता मृत्यूचे प्रमाण २0११ मध्ये १0८ होते, ते घटून आता ९६ वर आले आहे. २0१२ मध्ये ९८ तर २0१३ मध्ये ९६ मातांचे मृ त्यू झाले होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर यांनी जननीसुरक्षा, जननी- शिशू सुरक्षा योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आली असल्याने मातामृत्यूचा दर कमी झाला असल्याचे सांगीतले. आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीचे प्रमाण ९८ टक्के असून, ते १00 टक्कय़ांवर आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मातेला प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी जनसामान्यांमध्ये जागृती करण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
*वर्षभरात २१ मातांचा मृत्यू
जिल्हय़ात २0१३-१४ या आर्थिक वर्षात गर्भधारणनेनंतर आणि प्रसूती काळात बिकट परिस्थिती निर्माण होऊन २१ मातांचा मृत्यू झाला. २0११-१२ मध्ये २७ तर २0१२-१३ मध्ये २४ मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.
*जननी-शिशू सुरक्षा योजनेचा १७७४ जणांना लाभ
जननी-शिशू सुरक्षा योजनेंतर्गत माता आणि नवजात बालकांना उपचारासाठी घर ते दवाखाना आणि दवाखाना ते घरापर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. १0२ क्रमांकावर फोन करून ही सुविधा मिळविता येते. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेचा लाभ १७७४ माता आणि नवजात बालकांना झाला आहे.