आज फैसला; उत्सुकता शिगेला
By Admin | Updated: October 19, 2014 01:14 IST2014-10-19T01:14:39+5:302014-10-19T01:14:39+5:30
अकोला जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील ९३ उमेदवारांचे ठरणार भाग्य!

आज फैसला; उत्सुकता शिगेला
अकोला : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. या मतमोजणीत जिल्हय़ातील पाचही मतदारसंघातील ९३ उमेदवारांचे राजकीय भाग्य ठरणार आहे. त्यामुळे निवडणूक निकालात कुणाचे भाग्य फळफळते आणि कोणाकोणाला पराभवाचा सामना करावा लागतो, याबाबत जिल्हावासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हय़ातील आकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघातील १ हजार ४८0 मतदान केंद्रांवर बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत पाचही मतदारसंघातील ९३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. प्रत्येक मतदारसंघाची मतमोजणी १५ टेबलवर होणार आहे. त्यामध्ये १४ टेबलवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी होणार असून, एका टेबलवर पोस्टल मतांची मतमोजणी होणार आहे. त्यानुसार जिल्हय़ातील पाचही मतदारसंघांची मतमोजणी एकूण ७५ टेबलवर होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक मतगणना पर्यवेक्षक, एक मतगणना सहाय्यक व एक सूक्ष्म निरीक्षक असे तीन कर्मचारी राहणार आहेत. त्यानुसार पाचही मतदारसंघात ७५ टेबलवर होणार्या मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून एकूण २२५ मतगणना कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतमोजणीनंतर जाहीर होणार्या निवडणूक निकालात जिल्हय़ातील पाचही मतदारसंघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. त्यानुषंगाने निवडणूक निकालात कोणाकोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते आणि कोणाकोणाला पराभवाचा धक्का सहन करावा लागणार, याबाबतचे चित्र मतमोजणीनंतर रविवारी दुपारी १ वाजेपर्यंंत स्पष्ट होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील पाचही मतदारसंघांच्या निवडणूक निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.