तरूण शेतक-याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By Admin | Updated: September 28, 2014 00:28 IST2014-09-28T00:28:34+5:302014-09-28T00:28:34+5:30
विद्युत डीपीच्या तारेचा स्पर्श होऊन २५ वर्षीय युवकाचा मृत्यू.

तरूण शेतक-याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
मोताळा : शेतातील पिकांना फवारणी करीत असताना विद्युत डीपीच्या तारेचा स्पर्श होऊन २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३0 वाजता भाडगनी शिवारात घडली होती. याप्रकरणी विद्युत कंपनीच्या कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार पित्याने दिल्यावरून बोराखेडी पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी सहायक अभियंता व तंत्रज्ञावर गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर तालुक्यातील भाडगनी शिवारात २७ ऑगस्ट रोजी साडेअकाराच्या सुमारास सचिन दिलीप गणेशकर वय २५ रा. भाडगनी हा तरूण आपल्या शेतात पिकाला फवारणी करीत होता. दरम्यान शेतात असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या डीपीच्या तारेचा स्पर्श होऊन त्याचा मृत्यू झाला.
मृतक्याच्या वडीलाच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी ईश्वर राजाराम चौधरी स. अभियंता दा ताळा व भीमराव ओंकार पवार तंत्रज्ञ यांच्याविरोधात कलम ३0४ अ, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार कोळी करीत आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ग्रामीण भागातील अनेक डीपी उघड्या आहेत. त्याकडे संबंधित अधिकार्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.