कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडलेल्या महिलेचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 02:03 IST2016-03-21T02:03:52+5:302016-03-21T02:03:52+5:30

सर्वोपचार रुग्णालयात चौघींवर उपचार सुरू.

Death of a woman who died after family planning surgery | कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडलेल्या महिलेचा अखेर मृत्यू

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडलेल्या महिलेचा अखेर मृत्यू

अकोला: जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर पाच महिलांची प्रकृती गंभीर झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असताना, त्यापैकी एका महिलेचा रविवारी मृत्यू झाला. इतर चार महिलांवर उपचार सुरू असून, त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात गुरुवारी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच पूजा गायकी (हिवरखेड), शीतल देशमुख (निंबा) शालिनी टाले (बोरगाव मंजू), जया इंगळे (पिंप्री माळी, ता. मेहकर) आणि सविता गेडाम (तारफैल) या महिलांची प्रकृती बिघडली. यापैकी शीतल देशमुख आणि अन्य एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शीतल देशमुख (२५) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. इतर चार महिलांपैकी एका महिलेवर खासगी रुग्णालयात, तर तिघींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इंजेक्शन, औषधे ताब्यात
जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिलांची प्रकृती बिघडल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन अंबाडेकर यांची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक आर.एच. गिरी यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा समावेश आहे. या समितीने शस्त्रक्रियेसाठी उपयोगात आणलेल्या इंजेक्शनसह औषधे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेली औषधे आणि इंजेक्शन तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषध विज्ञानशास्त्र विभागाकडे पाठविण्यात आले आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर पुढे चौकशी करण्यात येणार आहे.

तीन दिवसांत ९0 शस्त्रक्रिया
जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात १५ ते १७ मार्च या तीन दिवसांमध्ये विविध प्रकारच्या तब्बल ९0 शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. यात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर पाच महिलांची प्रकृती बिघडण्यास नेमके कोण दोषी, याचा तपास चौकशी समिती करीत आहे.

Web Title: Death of a woman who died after family planning surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.