मळणी यंत्रात रुमाल अडकून फाशी बसल्याने इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: January 12, 2015 23:32 IST2015-01-12T23:25:55+5:302015-01-12T23:32:10+5:30
बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील घटना.

मळणी यंत्रात रुमाल अडकून फाशी बसल्याने इसमाचा मृत्यू
बुलडाणा : शेतात तुर काढीत असताना एका इसमाचा रुमाल मळणीयंत्रात अडकल्यामुळे गळफास लागून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. ही घटना १२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास डोंगरखंडाळा येथे घडली.
बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील नारायण छोटू चव्हाण (३८) याने बोराळा शिवारात शेती ठोक्याने घेतली होती. या शेतातील तुर मळणी यंत्राव्दारे काढण्याचे आज ठरविण्यात आले होते. दुपारी इंजीनवरील मळणी यंत्रातून तुर काढीत असताना नारायण चव्हाण हे तुरीचे कुटार काढण्यासाठी मळणी यंत्राजवळ गेले असता तेवढय़ात त्यांच्या गळयातील रुमाल मळणी यंत्राच्या रबरी पट्टयात अडकला. त्यामुळे मानेला गळफास लागून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी उपस्थित मजूरांनी तत्काळ मशिन बंद केली. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या घटनेची माहिती मिळताच गावातील असंख्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती ग्रामिण पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गावातील स्मशानभुमित शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्या त आले. प्रकरणी ग्रामिण पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे.