अतिक्रमण काढण्याच्या धसक्याने व्यावसायिकाचा मृत्यू
By Admin | Updated: October 30, 2014 01:10 IST2014-10-30T01:09:54+5:302014-10-30T01:10:38+5:30
व्यापारी आक्रमक: टिळक रोडवरील दुकाने बंद; मनपाविरुद्ध पोलिसात तक्रार

अतिक्रमण काढण्याच्या धसक्याने व्यावसायिकाचा मृत्यू
अ ोला: अतिक्रमण काढल्या जाण्याच्या धक्क्याने व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास टिळक रोडवर घडली. या घटनेचा निषेध म्हणून टिळक रोडवरील व्यापार्यांनी दुकाने बंद केली आणि शेकडो व्यापार्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेऊन महापालिका अतिक्रमण विभागाविरुद्ध तक्रार दिली. सिंधी कॅम्पमधील कच्ची खोली परिसरात राहणारे देवानंद चेतनदास थदानी (४५) यांची जुन्या कापड बाजारातील पोलिस चौकीसमोर फोटो फ्रेमिंगची छोटीशी दुकान आहे. बुधवारी दुपारी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने टिळक रोड भागात फिरून अतिक्रमणधारकांना दुकाने हटविण्यास बजावल्याने व्यापार्यामध्ये खळबळ उडाली. अतिक्रमण हटविण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली. दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी व कर्मचारी देवानंद थदानी यांच्या दुकानावर आले. त्यांना अतिक्रमण तातडीने हटविण्यास सांगितले. अतिक्रमण न काढल्यास, दुकानातील साहित्य जप्त करण्याचा इशारा दिला. दरम्यान, मनपा अतिक्रमण पथक व देवानंद थदानी यांच्यात बाचाबाची झाली. आता आपले अतिक्रमण हटविले जाणार, या धसक्याने देवानंद थदानी हे जागेवरच कोसळले. घटनास्थळावरील नागरिक व व्यापार्यांच्या मदतीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु तत्पूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच टिळक रोड, जुना कापड बाजारातील व्यापार्यांनी एकत्र येऊन महापालिका अतिक्रमण विभागाचा निषेध म्हणून परिसरातील दुकाने बंद केली आणि व्यापार्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. थदानी यांच्या चुलत भावाने अतिक्रमण विभागाविरुद्ध तक्रार दिली. उशिरा सायंकाळपर्यंत या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला.