बसच्या खिडकीवर डोके आदळल्याने भाजप प्रदेश पदाधिकार्याचा मृत्यू
By Admin | Updated: July 10, 2014 01:28 IST2014-07-10T01:23:54+5:302014-07-10T01:28:07+5:30
वाशिम येथील भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य कैलास जुनघरे

बसच्या खिडकीवर डोके आदळल्याने भाजप प्रदेश पदाधिकार्याचा मृत्यू
अकोला : एसटी बसमध्ये जागा पकडण्याच्या धावपळीत बसच्या खिडकीवर डोके आदळल्याने भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कैलास जुनघरे यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.३0 वाजता अकोल्यातील नवीन बसस्थानकावर घडली.
वाशिम येथील भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य कैलास जुनघरे हे बुधवारी दुपारी बसने अकोल्यात आले. त्यांची मुलगी शरयू ही अकोल्यामध्ये इयत्ता ११ वीमध्ये शिकते. तिला पुस्तके घेऊन देण्यासाठी ते बाजारात गेले. त्यांनी मुलीला पुस्तके खरेदी करून दिले. मुलीच्या खोलीवर गेले. तिची भेट घेतली आणि वाशिमला परत जाण्यासाठी ते नवीन बसस्थानकावर आले. वाशिमची बस आल्यावर ते बसकडे धावले. बसमध्ये जागा मिळण्यासाठी खिडकीतून रूमाल टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान त्यांचे डोके खिडकीवर आदळल्याने ते खाली कोसळले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉ क्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. कैलास जुनघरे यांनी अभाविपच्या माध्यमातूनच राजकारणाला सुरुवात केली. त्यांच्याकडे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी होती. ११ वर्ष भाजपाचे जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले. वाशिममधील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत ते शिक्षक होते. त्यांच्या पश्चात मुलगी शरयू, मुलगा शिवम, पत्नी, भाऊ, आई-वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे.