शेतातील माती चोरल्याच्या संशयावरून प्राणघातक हल्ला!
By Admin | Updated: December 14, 2015 02:35 IST2015-12-14T02:35:37+5:302015-12-14T02:35:37+5:30
बोरगाव वैराळेतील घटना; विहिरीत टाकून मारण्याचाही प्रयत्न.

शेतातील माती चोरल्याच्या संशयावरून प्राणघातक हल्ला!
उरळ (जि. अकोला): नजीकच्या बोरगाव वैराळे येथील शेतातील माती चोरून नेल्याच्या संशयावरून १३ डिसेंबर रोजी सकाळी चौघा जणांनी एका जणास पकडून शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत टाकण्याचा प्रयत्न केला. याबाबतच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी बोरगावातील चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. बोरगाव वैराळे येथील वासुदेव शेळके, गोपाल शेळके, पुरुषोत्तम शेळके व गजानन आमझरे यांनी रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेतातील माती चोरून नेल्याच्या कारणावरून गावातील दिलीप राजाराम सूर्यवंशी यास पकडून भाला व पाइपने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याला विहिरीत टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत जखमी झालेल्या दिलीप सूर्यवंशीला उपचारासाठी अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची तक्रार दिलीप सूर्यवंशीचा भाऊ संदीप सूर्यवंशीने उरळ पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. याबाबत उरळ पोलिसांनी उपरोल्लेखित चार जणांविरुद्ध भा.दं.वि.चे ३0७ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम देशमुख व प्रभारी ठाणेदार घनश्याम गुरुकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. या गुन्ह्याचा तपास उरळचे ठाणेदार पी.के. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर.के. साठवणे व पोलीस नायक संजय कुंभार व विजय चव्हाण करीत आहेत.