दिवस ४३; कामे ५२0!
By Admin | Updated: May 16, 2015 00:55 IST2015-05-16T00:55:22+5:302015-05-16T00:55:22+5:30
अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण उपाययोजनांची केवळ २७ कामे पूर्ण.

दिवस ४३; कामे ५२0!
संतोष येलकर /अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात ४५८ गावांमध्ये ५८२ उ पाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, १४ मेपर्यंत जिल्ह्यात केवळ २७ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यास केवळ ४३ दिवसांचा कालावधी उरला असून, या कालावधीत कृती आराखड्यातील राहिलेली ५२0 उपाययोजनांची कामे पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली. तापत्या उन्हासोबतच ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी गावागावांमध्ये ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ४५८ गावांसाठी ५८२ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. ११ कोटी ८३ लाख ३२ हजार रुपये खर्च प्रस्तावित असलेल्या या आराखड्याला १७ डिसेंबर २0१४ रोजी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी मंजुरी दिली. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस् तावांनुसार एकूण उपाययोजनांपैकी १७७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकार्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेल्या कामांपैकी १३ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ २७ उपाययोजनांची कामे सुरू करण्यात आली असून, ५३ उपाययोजनांची कामे सुरू आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी उ पाययोजनांच्या कामांचा आराखडा मंजूर झाल्यानंतर पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला. एकूण उ पाययोजनांच्या कामांपैकी केवळ २७ उपाययोजनांचीच कामे पूर्ण झाली. पाणीटंचाई निवारणाची कामे ३0 जूनपर्यंत करता येतील, पावसाळ्यात ही कामे करता येणार नाहीत, त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी उ पाययोजनांची कामे करण्यास शिल्लक राहिलेल्या ४४ दिवसांत कृती आराखड्यातील उर्वरित ५२0 उ पाययोजनांची कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. पाणीटंचाईच्या समस्येने ग्रामस्थ हैराण झाले असल्याच्या स्थितीत दुसरीकडे मात्र शेकडो उपाययोजनांची कामे रखडली आहेत.