दापुरा बनावे गाडगेबाबांच्या विचारांची कार्यशाळा
By Admin | Updated: December 20, 2014 00:08 IST2014-12-20T00:08:36+5:302014-12-20T00:08:36+5:30
स्वच्छतेचे प्रेरणा केंद्र दिल्लीऐवजी दापुरा बनावे

दापुरा बनावे गाडगेबाबांच्या विचारांची कार्यशाळा
डॉ. किरण वाघमारे/अकोला:
महाराष्ट्रात आपल्या लोकोद्धाराच्या कार्याने सुपरिचित असलेले संत गाडगेबाबा यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन काम करणार्यांची कमतरता नाही. तथापि, गाडगेबाबांना अपेक्षित असलेल्या कार्याचा वारसा पुढे चालविणार्यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा ही गाडगेबाबांचा सहवास लाभलेली भूमी कार्यशाळा करता येऊ शकते. यादृष्टीने शासन व प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.
उद्या, २0 डिसेंबर रोजी संत गाडगेबाबांचा स्मृतीदिन. कर्मयोगी गाडगेबाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला, तर बालपण अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा येथे गेले. गाडगेबाबा बरीच वर्षे इथे राहिले. डेबूपासून लोकसंत गाडगेबाबा बनण्याची पायाभरणी याच दापुरा येथे झाली. अनेक गोष्टींचे संस्कार इथेच बाबांवर रुजलेत. बाबांनी पुढे जे कर्मकाडांवर घणाघाती प्रहार केले, त्याचे धडे त्यांना याच दापुर्याच्या भूमीत मिळाले. दापुरापासून ऋणमोचन अगदी जवळ. त्यामुळेच इथे बाबांचे नेहमी जाणे असे. पुढे ऋणमोचनमध्येच बाबांनी भिकार्यांच्या आणि अंध-अपंगांच्या पंगती बसविल्या. अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे काम याच ऋणमोचनच्या भूमीत गाडगेबाबांनी केले. या सर्वांचे संस्कार बाबांवर दापुर्याच्या भूमीत झाले. गाडगेबाबांची ही कर्मभूमी आज मात्र उपेक्षित आहे.