दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचा-यांवर लागणार चाप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 01:41 IST2016-03-28T01:41:16+5:302016-03-28T01:41:16+5:30
१५ दिवसांत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये बायोमेट्रिक हजेरीची होणार अंमलबजावणी.

दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचा-यांवर लागणार चाप!
अकोला: ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या म्हणून आरोग्य सेवा सुधारण्यावर राज्य शासनाने भर दिला. त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतील दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचार्यांवर चाप लावण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचार्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविली जाणार आहे.
ग्रामीण भागात तातडीने आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत संचालित प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाकडून जनतेला मोठय़ा अपेक्षा असतात; मात्र गरजू रुग्णांना वेळेव उपचार मिळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य कर्मचारीच उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला शहरातील आरोग्य सेवांचा आधार घ्यावा लागतो. त्यात वेळेची आणि पैशांचीही हानी होते. याशिवाय वेळेवर उपचार न मिळाल्याने आजार गंभीर झाल्याचे प्रकारही घडतात. सुविधा असूनही केवळ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्यामुळे आरोग्य सेवांवर होणारे विपरीत परिणाम राज्य शासनाची आणि आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन करणारा ठरत आहे. त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही सक्षमपणे काम करीत नसल्याने आता राज्य शासनाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपजिल्हा रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविण्याचा आदेश २३ मार्च रोजी देण्यात आला.