अवकाळीमुळे पातूर तालुक्यातील ४६ घरांचे नुकसान; कांदा, पपई, लिंबूसह भाजीपालावर्गीय पिकांना फटका
By रवी दामोदर | Updated: April 1, 2023 19:49 IST2023-04-01T19:49:18+5:302023-04-01T19:49:43+5:30
गत दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत ३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता.

अवकाळीमुळे पातूर तालुक्यातील ४६ घरांचे नुकसान; कांदा, पपई, लिंबूसह भाजीपालावर्गीय पिकांना फटका
अकोला :
गत दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत ३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. आता पुन्हा दि.३१ मार्च रोजी जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पातूर तालुक्यातील तब्बल ४६ घरांचे नुकसान झाले आहे. तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील १३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा, पपई, लिंबूसह भाजीपालावर्गीय पिकांना अधिक फटका बसला आहे.
हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. सोसाट्याच्या वाऱ्याने पातूर, बार्शीटाकळी तालुक्यातील काही भागांसह शहरामध्ये विद्युत खांबांसह मोठे वृक्ष पूर्णतः कोसळले होेते. तर कापणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अकोला शहरासह इतर तालुक्यात अवकाळीच्या सरी कोसळल्या. शुक्रवार, दि.३१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास काही भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडला. याचा काढणीवर आलेल्या गहू पिकाला फटका बसला आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला असतानाच शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीवर आलेल्या गहू पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले.
नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी
जिल्ह्यात शुक्रवारी अवकाळी पाऊस व वादळामुळे पातूर तालुक्यातील ४६ घरांचे, तर बार्शीटाकळी तालुक्यातील कांदा, टरबूज, गहू, पपई, भाजीपाला इत्यादी शेतीपिकाचे अंदाजे १३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या भागात सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिकाच्या संरक्षणासाठी पीक विम्याचा भरणा केला होता, त्यांना पीक विम्याची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.