..उडान तो हौसलो से होती है
By Admin | Updated: November 24, 2014 01:15 IST2014-11-24T01:15:55+5:302014-11-24T01:15:55+5:30
मूकबधिर, अपंग मुलांच्या नृत्याविष्काराने भारावले सभागृह.

..उडान तो हौसलो से होती है
अकोला: चित्रपट, लोकगीतांवर थिरकणारी चिमुकली पावलं, सामाजिक अनिष्ट रूढी परंपरा, भरकटलेली खाद्य संस्कृती या नाटकांमधून सामाजिक संदेश देणारे मूकबधिर मुलांचे अडखळते आवाज, पात्राशी असलेली एकरूपता, त्यांच्यामधील जिद्द पदोपदी दर्शवित होती की, सपने उनके पुरे होते जिनके सपनो मे जान होती है, पंख होनेसे कुछ नही होता, उडान तो हौसलो से होती है. रविवारी सायंकाळी मूकबधिर व अपंग मुलांनी सादर केलेल्या नृत्य कलाविष्काराने संपूर्ण सभागृह भारावले होते. कार्यक्रमाला असलेली श्रोत्यांची खच्चून गर्दी अन् प्रत्येक नृत्यावर, नाटकावर मिळत असलेली टाळ्यांची साद मुलांचा उत्साह द्विगुणीत करीत हो ती. एकवीरा मल्टी पर्पज सोसायटीच्यावतीने मूकबधिर मुले व पालकांचा स्नेहमीलन सोहळा २३ नोव्हेंबर रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकवीरा मल्टी पर्पज फाऊंडेशनचे संस्थापक प्रल्हादराव बनसोड होते, उद्घाटक म्हणून हरेश शाह होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. नानासाहेब चौधरी, ठाणे डेफ वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव घैघास, इनरव्हिल क्लब ऑफ अकोला क्विन्सचे जसलीन साहनी, संस्थेच्या मानद वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती रेंगे, एकवीरा मल्टी पर्पज फाऊंडेशनच्या सचिव डॉ. स्नेहल कलोरे यांची उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला एकदन्ताय, वक्रतुंडाय, गौरीतनया या गीतावर नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर भाजीपाल्याचे महत्त्व सांगणारी नाटिका चिमुकल्या मुलांनी सादर केली. अग्गं बाई, ढग्गो बाई व गवळण नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. प्रत्येक फळाचे महत्त्व सांगणार्या नाटिकेत चिमुकल्या मुलांनी साकारलेली राजा व प्रधानांची भूमिका तसेच त्यांनी परिधान केलेल्या पोषाखातून त्यांची पात्राबद्दलची आत्मीयता दिसत होती. यानंतर मुलांनी रघुपती राघव राजाराम या गीतावर नृत्य सादर केले. संचालन उपकार्यकारी अभियंता सुशील जयस्वाल व महाराष्ट्र बँकेच्या उपप्रबंधक शेफाली जयस्वाल यांनी केले.