खिरपुरी येथे दरोडा
By Admin | Updated: July 15, 2014 00:14 IST2014-07-15T00:14:26+5:302014-07-15T00:14:26+5:30
दीड लाखांचा ऐवज लंपास

खिरपुरी येथे दरोडा
बाळापूर : संपूर्ण जिल्हय़ात चोरटे सक्रीय झाल्याची अफवा असताना, अज्ञात चोरट्यांनी बाळापूर तालुक्यातील खिरपुरी खुर्द येथील एका घरात सशस्त्र दरोडा टाकून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह एकूण १ लाख ७९ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार, १२ जुलै रोजी घडली. प्राप्त माहितीनुसार, खिरपुरी येथील अनिल मधुकर दांदळे यांच्या घरात शनिवारी रात्री आठ वाजताचे सुमारास चार चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी घरात दांदळे यांची भाची एकटीच होती. घरात कोणीही पुरुष मंडळी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या भाचीला गुंगीच्या औषधाने बेशुद्ध केले व तिच्यावर चाकुचे वारही केले. त्यानंतर घरातील एक लाख ४७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक मेसह एकूण एक लाख ७९ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. सदर घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे ठाणेदार सुनील सोळंके हे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांच्या अफवेने आधीच परिसरातील लोकांची झोप उडाली असताना, या घटनेमुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिसांत भादंविच्या कलम ४५७, ४५८, ३८0 आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)