आकोट : गुरुमाउली श्री संत वासुदेव महाराजांच्या पुण्यभूमीत सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याचे कार्य जाणीवपूर्वक होत आहे. आध्यात्मिक संस्कारासह नीतीमूल्य व उच्चतम विचार बालवयातच रुजविणे काळाची गरज आहे. त्याशिवाय भारतीय संस्कृती टिकणार नाही, हे ओळखूनच गुरुमाउली संत वासुदेव महाराजांनी बालसंस्कार शिबिराची ५० वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली. हा वारसा श्रद्धासागर येथे निष्ठेने जोपासल्या जातो, असे भावोद्गार नगराध्यक्ष बरेठिया यांनी काढले. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारा आयोजित बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन आकोटचे नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव हिंगणकर होते. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेवराव महल्ले, गंगाधरजी गोहाड, हभप अंबादास महाराज, ज्ञानेशप्रसाद पाटील, शिबिरप्रमुख मोहन महाराज मेतकर, संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर, विश्वस्त दादाराव पुंडेकर, अशोकराव पाचडे, सदाशिवराव पोटे, अनिल कोरपे, जयदीप सोनखासकर आदी उपस्थित होते. श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे आयोजित बालसंस्कार शिबिरात वर्हाडासह हिंगोली, परभणी जिल्ह्यातील गावोगावचे बालवैष्णव आध्यात्मिक साधनेसाठी श्रीक्षेत्र श्रद्धासागरला दाखल झाले. बालगोपालांच्या उपस्थितीने या पुण्यभूमीला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. शिबिरात सहभागी १५० बालकांना वारकरी परंपरेनुसार माळकरी करण्यात आले. धोतर, टोपी, कपाळी अष्टगंध बुक्का अशी वारकरी वेशातील बालवैष्णव व त्यांची शिस्त, चैतन्य, उत्साहाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रारंभी अतिथींचे स्वागत शिबिरप्रमुख हभप मोहन महाराज मेतकर, संभाजी महाराज नवले, सुरेश महाराज लांडे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, गोपाल महाराज जनारे, सतीश महाराज जाणे, सचिन महाराज निचळ, प्रवीण महाराज कुलट, शिवा महाराज, राधेश्याम महाराज ढोले यांनी केले. शिबिराच्या आयोजनाची भूमिका व रूपरेषा हभप वासुदेवराव महल्ले यांनी प्रास्ताविकातून विशद केली. हभप गंगाधरराव गोहाड, हभप ज्ञानेशप्रसाद पाटील यांनी शिबिरार्थ्यांशी हितगूज केले. अध्यक्षीय भाषण पंजाबराव हिंगणकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुरेशराव कराळे, आभारप्रदर्शन डब्ल्यू. राममूर्ती यांनी केले. याप्रसंगी शिबिरार्थी, शिक्षकवृंद, पालक व संस्थेचे आजीवन सदस्य उपस्थित होते.
बालसंस्कार शिबिरातून संस्कृती संवर्धन व्हावे - बरेठिया
By admin | Updated: May 6, 2014 21:20 IST