शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आखडता हात घेणाऱ्या बँकांनी वर्ष २०२०-२०२१ मध्ये प्रथमच हात सैल केला. खरीप हंगामात लक्ष्यांकाच्या ७४ टक्के तर रबी हंगामात ९८ टक्के कर्ज वाटप करून उच्चांक गाठला गेला. २०२०-२०२१ मध्ये खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपयांचे लक्ष्यांक होते. राष्ट्रीय, ग्रामीण व खासगी क्षेत्रातील बँकांकडे १ लाख ४२ हजार ५०० खातेदार आहे. त्यातील १ लाख ६ हजार ४३४ खातेदारांनी एकूण ८४६ कोटी रुपये कर्ज घेतले.
कर्ज वाटपाची सरासरी ७४ टक्के इतकी आहे. तर रबी हंगामात ६० कोटी लक्ष्यांक असताना ६ हजार १६२ खातेदारांनी ५८ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्ज वाटपाची सरासरी ९८ टक्के आहे.
सरलेल्या हंगामात उच्चांकी कर्जवाटप झाल्याने यंदा तशीच अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. कर्जमाफीचा लाभ यंदा झालेल्या उत्पन्नाच्या सरासरीवर कर्ज वाटपाचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय बँकर समितीने केलेल्या नियोजनात यंदा लक्ष्यांकात घट किंवा वाढ करण्याची शिफारस केली नाही. लक्ष्यांक मागील वर्षीप्रमाणेच राहणार आहे. सरलेल्या हंगामात पिकांना मिळालेला वाढीव भाव बघता कर्जफेडीची श्वाश्वती बँकांना आहे.
--बॉक्स--
कर्जमुक्तीचा मिळाला आधार
राज्यातील सत्तांतरानंतर महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांसोबत बँकांनाही झाला. मागील येणी वसूल झाल्याने बँकांनी हात सैल करीत नवीन कर्जासाठी शेतकऱ्यांना पात्र ठरवत कर्ज दिले. दरवर्षी कर्जासाठी बँकांच्या पायऱ्या झिजविणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या हंगामात कर्ज मिळाली होती.
--कोट--
यावर्षी लक्ष्यांकातील रकमेत बदल करण्यात आला नाही. पात्र शेतकऱ्यांनी सावकारांच्या मागे न लागता बँकेतूनच पीक कर्ज घ्यावे.
-आलोक तारेनिया, व्यवस्थापक, अग्रणी बँक