शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित द्यावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:18+5:302021-05-15T04:17:18+5:30
----------------------------------------------------- वाडेगाव येथे ईव्हीएम मशीन प्रतिमा जलाओ आंदोलन वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे शासनाचे नियम पाळून रॅली काढून ...

शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित द्यावा !
-----------------------------------------------------
वाडेगाव येथे ईव्हीएम मशीन प्रतिमा जलाओ आंदोलन
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे शासनाचे नियम पाळून रॅली काढून भारतीय बेरोजगार मोर्चाद्वारे ईव्हीएम मशीन ‘प्रतिमा जलाओ’ आंदोलन दि. १३ मे बुधवार रोजी करण्यात आले. या आंदोलन दरम्यान श्याम अवचार, देवानंद अवचार,सतिष अवचार, राजेश अवचार, वंदना अवचार, वैशाली इंगोले, विजया जंजाळ, कविता अवचार, संदेश कांबळे,चंदन जंजाळ, काशिनाथ तायडे,सुधाकर जंजाळ,रेखा अवचार, विशाखा अवचार आदी बेरोजगार युवा उपस्थिती होते. (फोटो)
-----------------------------------
‘आठवडे बाजारात विद्युत व्यवस्था करा ! ’
वाडेगाव : येथील गावात आठवडे बाजार भरतो. गावातील या रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने सुरळीत विद्युत पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
---------------------------
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्ताची मागणी
बार्शी टाकळी : स्थानिक परिसरातील शेतशिवारात अनेक मोकाट कुत्रे असून, हे कुत्रे एकटी महिला किंवा पुरुष पाहून हल्ला करतात. पाळीव जनावरांना ही ते जखमी करीत आहेत. अशा अनेक घटना शिवारात घडल्या असल्याने शेळी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
--------------------------------
पेट्रोल पंपावर सुविधांचा अभाव
तेल्हारा : शहरात अनेक पेट्रोलपंप आहेत. मात्र यातील बहुतांश पेट्रोलपंपावर वाहन धारकांना शुद्ध पिण्याचे पाणी, वाहनाची हवा चेक करणे तसेच ये-जा करण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने समस्या वाढल्या आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
------------------------
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता
पातूर : शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भरण घालण्यात आले असले तरी, ते साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
------------------------------
वाढत्या महागाईने घर बांधकाम झाले महाग
बाळापूर : सर्व सुविधांयुक्त घर असावे, कार असावी, अशी अनेकांची इच्छा असते ; परंतु सध्या नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडल्याने अनेकांचे नवीन घराचे स्वप्न आजच्या घडीला महागाईच्या विळख्यात सापडले आहे. आधीच बांधकामाचे साहित्याचे वाढलेले भाव आता त्यात इंधन दरवाढीची भर पडली आहे. कारण इंधनाचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च पण वाढला आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्याने पयार्याने बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली.
---------------------------------------
लोणाग्रा येथील नाल्या तुंबलेल्या
आगर : येथून जवळच असलेल्या लोणाग्रा येथे नालीच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, नाल्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
----------------------------
ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था
अंदुरा : रेती वाहतुकीच्या अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे निंबा-अडसूळ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक तालुक्यातील रेती घाट लगतच्या गावातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
---------------------------------------
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुस मार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे याचे दुपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. कोरोनामुळे सध्या रस्त्यावर कमी वाहतूक आहे.
--------------------------------
‘जुन्या वाहनांना कालबाह्य करावे !’
अकोट : शहरात वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
—————————-
बाळापूर : गावांना रस्त्याची प्रतीक्षा
बाळापूर : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेने ये-जा करावी लागते. अनेक गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. अनेकदा रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली.
-----------------------------------
केरोसीन अभावी अडचण वाढली !
हिवरखेड : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो ; मात्र केरोसीन बंद झाल्याने अडचण जात आहे. त्यामुळे केरोसीन पुरविण्याची मागणी आहे.
-----------------------------
लाॅकडाऊनमध्ये मोबाईलचा वापर
मूर्तिजापूर : ऑनलाईन शिक्षण आणि ‘वर्क टू होम’मुळे मोबाईलचा वापर वाढला आहे. मुलांनाही इच्छा नसताना मोबाईल हाताळावे लागत असल्याने डोळ्याचा व कानाचा आजार बळावत आहे. विशेषतः मुलांमध्ये एकलकोंडेपणा व चिडचिडेपणा वाढल्याचे दिसून येत आहे.
----------------------------
प्लास्टिकमुळे पशुधनाला धोका
खानापूर: प्लास्टिकवर बंदी असताना बाजारपेठेत अद्यापही छुप्या मार्गाने प्लास्टिकचा वापर होत आहे. हे प्लास्टिक रस्त्यावर फेकले जात असून ते जनावरे खात असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका उद्भवत आहे. अनेक जनावरांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातील प्लास्टिक काढावे लागले.
---------------------------------
तंबाखूजन्य पदार्थांची युवकांमध्ये ‘क्रेझ ’
बार्शी टाकळी : युवकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची क्रेझ कायम असून बंदीनंतर अवैध मार्गाने याची विक्री होत आहे. व्यसनाला युवा पिढी बळी पडत असून, यावर निर्बंध घालणे गरजेचे ठरत आहे. जनजागृती होत असली, तरी याला आवर घालणे कठीण होत आहे. चढ्या भावाने ही खरेदी केली जात आहे.