पिकांना फटका; शेतकरी हवालदिल
By Admin | Updated: May 9, 2016 02:42 IST2016-05-09T02:21:09+5:302016-05-09T02:42:15+5:30
बाळापूर तालुक्यात कांदा, लिंबू पिकांचे नुकसान
_ns.jpg)
पिकांना फटका; शेतकरी हवालदिल
बाळापूर/हातरूण/बोरगाव (वैराळे): अवकाळी पावसाचा फटका बाळापूर तालुक्यातील कांदा व लिंबू पिकांना बसला. यापूर्वी शुक्रवारी तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. वादळी वार्यामुळे विद्युत खांबही कोसळले होते. रविवारीही अशीच काहीशी परिस्थिती होती. बाळापूर येथे प्रथम ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शहरात पाऊस झाला. तालुक्यातील अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
बोरगाव वैराळे परिसरात पावसामुळे शेतात साठविण्यासाठी ठेवलेला कांदा भिजल्याने आधीच दुष्काळामुळे संकटात सापडलेले शेतकरी हवालदिल झाले. गतवर्षी लवकरच पावसाने दडी मारल्याने शेतजमीन कडक झाल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे थांबली होती; मात्र रविवारी पावसाचे दमदार आगमन झाल्याने पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. चाराटंचाई असलेल्या बोरगाव वैराळे परिसरात जनावरांनाही नवीन हिरवा चारा मिळणार आहे. वादळी पावसामुळे या भागातील वीजपुरवठा मात्र रात्री उशिरापर्यंत खंडित होता.
उरळ परिसरात रविवारी जोरदार पाऊस झाला. वादळी वार्यामुळे टिनपत्रे उडून गेली. काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. यात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. लोहारा परिसरात रविवारी जोरदार पाऊस झाला. शेगाव-आकोट रोडवर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही वेळा वाहतूक विस्कळीत झाली होती.