कौतुकाचा पाऊस.....पण पथकाची ओंजळ कोरडीच!
By Admin | Updated: July 12, 2016 01:18 IST2016-07-12T01:18:56+5:302016-07-12T01:18:56+5:30
गाडगेबाबा शोध पथकाचे आपत्ती व्यवस्थापनात भरीव काम; मात्र निधीची वानवा!

कौतुकाचा पाऊस.....पण पथकाची ओंजळ कोरडीच!
राजेश शेगोकार / अकोला
जिल्ह्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली, नागरिक पाण्यात अडकले किंवा आगीत सापडले, रुग्णाला तातडीने दवाखान्यात पोहोचवायचे, अडकलेल्या वन्यप्राण्याचे रेस्क्यू ऑपरेशन करायचे, या सर्व संकटातून बाहेर पडण्याच्या मदतीसाठी फक्त आणि फक्त एकच नाव असतंय, ते म्हणजे ह्यगाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक. रविवारी रात्रीसुद्धा या पथकाने अकोल्यातील डॉ. सुरेश मुंदडा, पुष्पाताई सुरेश मुंदडा आणि चालक संजय गुल्हाने अशा तिघांची मृत्यूच्या दारातून सुटका केली. दिवसभर या पथकाच्या कौतुकाचे मॅसेज सोशल मीडियामधून फिरत होते; मात्र ज्या प्रमाणे पाण्यात माशाचे अश्रू दिसत नाहीत, त्याच प्रमाणे कौतुकाच्या वर्षावात या पथकाची वेदना कोणी जाणून घेतली नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून या पथकाकडे असलेले वाहन टायरअभावी बंद आहे. रविवारी दर्यापूरकडे जाण्यासाठी त्यांना भाड्याची गाडी न्यावी लागली आहे.
अकोला जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीच्या हाकेला ओ देत तत्काळ धावून जाणारा हा धेय्यवादी तरुणांचा हा संच. तब्बल १२ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्षभर कार्यरत असतो. २00३ मध्ये अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातल्या पिंजर गावातल्या दीपक सदाफळे या सामाजिक विचारांनी भारलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने लोकांना जीवन देणार्या या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. या चळवळीच्या जन्माला एक छोटी घटना कारणीभूत ठरलीय. दीपकच्या पिंजर गावातील एका व्यक्तीचा वेळेवर दवाखान्यात नेता आले नाही म्हणून मृत्यू झालाय. एक कुटुंब उघडं पडलंय. नेमके याच घटनेच्या अस्वस्थेतून दीपकने पुढचे आयुष्य लोकांना जीवन देण्याच्या कामात खर्ची घालण्याचा निश्चय केलाय. त्याच्या या विचाराला गावातील २0 मित्रांनी उचलून धरले अन् याच विचारातून ह्यगाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचा जन्म झाला. या पथकाला रविवारी रात्री पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांचा फोन आला. त्यांनी दर्यापूरची स्थिती सांगितली. पालकमंत्र्यांचा फोन ठेवताच या पथकाने जुळवाजुळव करीत भाड्याने गाडी करून गयाटी नाला गाठला व सहा तासांपासून जीव मुठीत धरून असलेल्या मुंदडा परिवाराची सुटका केली. पैसे नाहीत म्हणून या पथकाने कधी आपलं काम थांबवलं नाही. प्रसंगी उसनवारी केली; पण आपला लोकांनी ह्यजीवनदायीह्ण ठरण्याचा वसा मोठय़ा ताकदीने आणि प्राणपणाने पुढे नेलाय. फक्त अकोला जिल्हाच नाही तर उत्तराखंडमधील जलप्रलय असो की माळीणची दुर्घटना, गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक सर्वच ठिकाणी मदतीसाठी समोर आणि तत्पर होतंय. पुरात अडकलेले लोक असोत की विहिरीत पडलेला बिबट्या, सर्वांना जीवनदान देण्याचे काम या चळवळीने केले आहे.