जिल्हय़ात गुन्हेगारीचा आलेख चढता!
By Admin | Updated: July 30, 2014 01:14 IST2014-07-30T01:14:48+5:302014-07-30T01:14:48+5:30
सहा महिन्यांमध्ये ७६८ गुन्हे; हत्या व प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ

जिल्हय़ात गुन्हेगारीचा आलेख चढता!
अकोला: अकोला: पोलिसांचे तुटपुंजे मनुष्यबळ म्हणा किंवा कमी झालेली सेवेची भावना आणि गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्याविषयीची अनास्था यामुळेच की काय, जिल्हय़ामध्ये गुन्हेगारीचा आलेख कमी होण्याऐवजी वाढतोच आहे. अवघ्या सहा महिन्यांमध्ये जिल्हय़ामध्ये ७६८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. दर महिन्याला १00 ते १२५ च्यावर गुन्हे घडतात. परंतु पोलिसांकडून गुन्हय़ांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत.
महिन्याकाठी गुन्हय़ांची आकडेवारी तपासून पाहिल्यास त्यामध्ये वाढच झालेली दिसून येते. एक गुन्हा घडला की, लगेच दुसरा घडतो. पीएसआयकडे तपासाची जबाबदारी दिल्यानंतर तो अधिकारीही द्विधा मन:स्थितीत पडतो. कुठल्या गुन्हय़ाचा तपास करायचा? त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी नागरिक करतात. गुन्हा घडल्यावर महिने, वर्ष उलटतात तरी तो गुन्हा उघडकीस आणल्या जात नाही किंवा आरोपीला गजाआड केले जात नाही.
चोरी, घरफोडी, रॉबरीसारखे गंभीर गुन्हे घडतात. परंतु पोलिस आरोपीचा छडा लावण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल उंचावते आणि हेच लोक गुन्हय़ांवर गुन्हे घडवितात. त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्याऐवजी अधिकच फोफावते.