अतिक्रमणधारकांना फौजदारीचा इशारा
By Admin | Updated: July 6, 2014 00:44 IST2014-07-06T00:39:44+5:302014-07-06T00:44:48+5:30
ज्या भागात अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी प्रशासनाच्यावतीने घेतली जात आहे.

अतिक्रमणधारकांना फौजदारीचा इशारा
अकोला : शहराच्या प्रमुख मार्गावरील अतिक्रमण काढल्यानंतर या ठिकाणी संभाव्य उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी अरुण शिंदे, मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, तहसीलदार संतोष शिंदे व मनपाचे इतर अधिकारी उपस्थित होते. शहराला अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प केलेल्या मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी २६ जूनपासून धडक मोहिमेला सुरुवात केली. यामध्ये प्रामुख्याने टॉवर चौक, जठारपेठ चौक, रेल्वे स्टेशन चौक, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज, टिळक रोड,जुना शहर, सिंधी कॅम्प, जवाहरनगर आदी परिसराचा समावेश आहे. टॉवर चौकात लिज संपलेल्या दुकानांना जमीनदोस्त करण्यात आले. यासह शहरात ज्या भागात अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी प्रशासनाच्यावतीने घेतली जात आहे. याकरिता संबंधित भागात कायमस्वरूपी व विकासात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने शनिवारी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी अरूण शिंदे यांना विविध भागातील अतिक्रमीत जागांची माहिती देत पाहणी केली. यामध्ये टिळक रोड, कॉटन मार्केट, रेल्वे स्टेशन परिसर, टॉवर चौक, जठारपेठ चौक, अशोक वाटिका चौक, सिंधी कॅम्प ते तुकाराम चौकाचा समावेश होता. पाहणीच्या वेळी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, नगर रचनाकार संदीप गावंडे, शहर अभियंता अजय गुजर उपस्थित होते.