१२५ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: April 4, 2015 02:03 IST2015-04-04T02:03:57+5:302015-04-04T02:03:57+5:30
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना पोलिसांविरोधात नारेबाजी करणे भोवले.

१२५ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर गुन्हे दाखल
अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये गुरुवारी उशिरा रात्री हाणामारी झाली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या विरोधात अश्लील नारेबाजी केली होती. याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या १२५ विद्यार्थ्यांवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. गांधीग्राम येथील रहिवासी प्रकाश महादेव अढाऊ यांचा अपघात झाल्याने गुरूवारी रात्री त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर उपचार करण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत अढाऊ यांच्या नातेवाईकांनी केल्याने त्यांच्यात आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांच्यात हाणामारी झाली होती. डॉ. वैशाली रामदास माटे नामक विद्यार्थिनीसही जमावाने मारहाण केली. दोन्ही गटांकडून झालेल्या हाणामारीत डॉ. शशिकांत मेडशीकर, डॉ. वैशाली माटे, डॉ. जुगल, डॉ. नवीन गायधने, डॉ. दळवीसह आणखी काही विद्यार्थी जखमी झाले होते. डॉक्टरांनी अढाऊ यांच्या नातेवाइकांना मारहाण केल्याने प्रकाश अढाऊ यांची मुलगी, एक वृद्ध आणि आणखी चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटांविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी गुन्हे दाखल केले. विद्यार्थ्यांनी रुग्णाच्या नातेवाइकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. त्यानंतर लगेच १00 ते १५0 विद्यार्थ्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासमोर ह्यअकोला पोलीस हाय..हायह्ण अशा घोषणा देऊन पोलिसांविरुद्ध अश्लील भाषेत नारेबाजी केली. पाच ते सहा महिन्यांपूर्वी असाच प्रकार वैद्यकीय महाविद्यालयात घडला होता. त्यावेळीही पोलिसांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली होती. यावेळी मात्र पोलिसांनी प्रशिक्षणार्थी मयूर तायडेसह १२५ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, ३५३, २९४, ५0४, ५0६, ३३२ नुसार गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.