घरकुलांच्या लाभार्थी यादीत त्रुटी आढळल्यास फौजदारी कारवाई!

By Admin | Updated: August 27, 2016 03:07 IST2016-08-27T03:07:09+5:302016-08-27T03:07:09+5:30

जिल्हाधिकारी-सीईओंचा इशारा: ‘बीडीओं’ना दिले पत्र.

Criminal action will be found if there is an error in the beneficiary list of the house! | घरकुलांच्या लाभार्थी यादीत त्रुटी आढळल्यास फौजदारी कारवाई!

घरकुलांच्या लाभार्थी यादीत त्रुटी आढळल्यास फौजदारी कारवाई!

अकोला, दि. २६: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल वाटपात लाभार्थी याद्यांच्या जिल्हास्तरावरील तपासणीत त्रुटी आढळून आल्यास संबंधित सरपंच, ग्रामसेवक, ग्राम विस्तार अधिकारी, ग्राम रोजगारसेवक व संबंधित यंत्रणेवर शासकीय कामात अपहार केल्याबाबत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अरुण विधळे यांनी शुक्रवारी दिला. जिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्य गटविकास अधिकार्‍यांना (बीडीओ) दिलेल्या पत्रात हा इशारा देण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड करताना नियमांचे पालन होत नाही. तसेच गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात होत आहेत, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल वाटपासाठी लाभार्थ्यांंची यादी तयार करताना, शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करूनच लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात यावी. लाभार्थी याद्यांची तपासणी जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे. या तपासणीत लाभार्थी याद्यांमध्ये त्रुटी असल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्राम विस्तार अधिकारी, ग्राम रोजगारसेवक व संबंधित यंत्रणेवर शासकीय कामात अपहार केल्याबाबत फौजदारी गुन्हे दाखल कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी जिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात देण्यात आला आहे.

Web Title: Criminal action will be found if there is an error in the beneficiary list of the house!