न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:18 IST2021-03-14T04:18:40+5:302021-03-14T04:18:40+5:30
अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगांव येथील रहिवाशी गोपाल चंद्रभान हाडोळे व त्यांची पत्नी प्रतिभा गोपाल हाडोळे आणि त्यांचे सहयोगी ...

न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगांव येथील रहिवाशी गोपाल चंद्रभान हाडोळे व त्यांची पत्नी प्रतिभा गोपाल हाडोळे आणि त्यांचे सहयोगी सचिन रामराव मानकर यांच्याविरुद्ध अकोल्यातील चार्टड अकाउंटट विनय थावरानी यांनी केलेल्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.
गोपाल हाडोळे यांनी विनय थावरानी यांच्याकडून २०१६ मध्ये १६ लाख रुपये, तर २०१७ मध्ये २ लाख रुपये घेतले होते. २०१८ मध्ये परत १० लाख रुपये चंद्रभान हाडोळे ॲन्ड सन्स या प्रतिष्ठानच्या नावाने धनादेशद्वारे घेतले होते. हे सर्व व्यवहार वैयक्तिक संबंधामुळे व बिनव्याजी स्वरूपाचे होते. त्याबदल्यात गोपाल हाडोळे यांनी १८ लाख रुपये व दहा लाख रुपयांचे धनादेश या रकमेच्या परतफेडीकरिता दिले होते. विनय थावरानी यांनी दोन वर्षे पैसे परत करण्याची सतत मागणी केल्यानंतरही गोपाल हाडोळे यांनी पैसे परत न केल्यामुळे धनादेश वटविण्यासाठी बँकेत जमा केले असता हे धनादेश बाउन्स झाले. त्यामुळे थावरानी यांनी १२ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रतिभा गोपाल हाडोळे व १६ एप्रिल २०१९ रोजी गोपाल हाडोळे याच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे संतापाने गोपाल हाडोळेने विनय थावरानी व यशपाल शर्मा यांच्या विरोधात खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. खदान पोलीस स्टेशननेही गुन्हे दाखल केले होते. मात्र दाखल करण्यात आलेली तक्रार शंकास्पद वाटल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विनय थावरानी व यशपाल शर्मा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यास स्थगिती दिली होती. याशिवाय थावरानी व शर्मा यांची कायम जमानतही मंजूर केली होती.
जिल्हा सत्र न्यायालयात जमानतीसाठी थावरानी यांनी सादर केलेल्या अर्जावर गोपाल हाडोळेने न्यायालयात बनावट करारनामा सादर केला होता. या करारनाम्यातील विनय थावरानी यांच्या सह्या खोट्या असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यांनतर विनय थावरानी यांनी तक्रार दाखल केल्यावर गोपाल हाडोळे त्यांची पत्नी प्रतिभा हाडोळे व सचिन मानकर यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४२३, ४६५, ४६८, ४७१, १९७, १९८, ३४, व १२० (ब) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.