शाळकरी मुलीचा विनयभंग; आराेपीला पाच वर्षांची शिक्षा
By आशीष गावंडे | Updated: May 21, 2024 20:19 IST2024-05-21T20:18:36+5:302024-05-21T20:19:11+5:30
मुलीला वारंवार त्रास देत असल्यामुळे मुलीच्या आईने त्याची अनेकदा समजूत काढली हाेती.

शाळकरी मुलीचा विनयभंग; आराेपीला पाच वर्षांची शिक्षा
अकाेला: शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तीला मानसिक त्रास देणारा २३ वर्षीय आराेपी दर्शन गाडे याला वि.अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांनी पाच वर्षांची शिक्षा ठाेठावली आहे. मंगळवारी या प्रकरणाचा निकाल लागला. दरम्यान, रामदास पेठ पाेलिसांनी सदर प्रकरणाचा तपास वेळेच्या आत पूर्ण केल्याचे समाेर आले.
या प्रकरणी घटनेची हकीकत अशी की, सप्टेंबर २०२३ मध्ये फिर्यादीची मुलगी अंदाजे वय १५ वर्ष हीला आराेपी दर्शन संजय गाडे रा.अकाेटफैल हा नेहमी त्रास द्यायचा. मुलगी शाळेत जात असताना शाळेच्या मुख्य दरवाजा जवळ आरोपीने फिर्यादीच्या मुलीचा हात पकडून मला तुझ्याशी बोलायचे आहे, तु माझ्यासाेबत का बोलत नाहीस, असा तगादा लावला. त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी आरोपीला पकडून मुख्याध्यापकांच्या समोर हजर केले असता, आरोपी शिक्षकांच्या आंगावर धावून गेला व त्यानंतर त्याने पलायन केले.
आराेपी मुलीला वारंवार त्रास देत असल्यामुळे मुलीच्या आईने त्याची अनेकदा समजूत काढली हाेती. तरीही आरोपीने अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केला. पिडीत मुलीने ही बाब तिच्या घरी सांगिल्यानंतर आईने २३ सप्टेंबर २०२३ रोजी रामदास पेठ पाेलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली हाेती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पाेलिसांनी भादंवि कलम ३५४, ३५४ अ, ड पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला हाेता. याप्रकरणी वि.अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांनी २१ मे रोजी आरोपी दर्शन गाडे यास भादंवि ३५४, ३५४ अ व पोक्साे कलम ७ व ८ अंतर्गत दोषी ठरवत ३ वर्ष सक्त मजुरी, तीन हजार रुपये दंड व ३५४ ड अंतर्गत दाेन वर्ष सक्त मजुरी व दाेन हजार रुपये दंड अशी एकूण ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
महिला अधिकाऱ्याकडे तपास
दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास रामदास पेठ पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक मनाेज बहुरे यांनी पाेलिस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे,पाेकाॅ.लेखनिक कावेरी ढाकणे यांच्याकडे साेपवला हाेता. ‘पीएसआय’ पुंडगे यांनी जलदगतीने तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.