आमदार श्रीकांत देशपांडे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 18:55 IST2020-11-21T18:55:02+5:302020-11-21T18:55:30+5:30
MLA Shrikant Deshpande News रामदासपेठ पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार श्रीकांत देशपांडे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा
अकोला : रामदास पेठ पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत कुठलीही परवानगी न घेता, सभा घेतल्याने शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात उभे असलेले आ. श्रीकांत देशपांडे यांच्यावर रामदासपेठ पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत रिंगणात असलेल्या आ. श्रीकांत देशपांडे यांनी शहरातील ज्युबली इंग्लीश स्कुलमध्ये शिक्षक मतदारांची बैठक घेतली. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या भरारी पथकातील नायब तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयोजक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता, कोरोना सारख्या साथीच्या रोगाचा प्रसार होईल याची जाण असताना सुध्दा प्रचार बैठकीचे आयोजन केल्याने त्याच्याविरध्द भारतीय दंड विधानाच्या कलम २६९, २७०, १८८ तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब तसेच साथरोग अधिनियम १९९७ कलम २,३,४ अन्वये रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अमरावतीतही गुन्हा दाखल
अकोल्यात घेतलेल्या बैठकीप्रमाणेच अमरावती येथेही जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी न घेता, बैठक आयोजीत केल्याप्रकरणी आमदार श्रीकांत देशपांडे यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या भंगासह आचारसंहीतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची आचारसंहीता लागु असल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.