नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६८ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:19 IST2021-04-20T04:19:58+5:302021-04-20T04:19:58+5:30
अकोला : शहरासह जिल्हाभरात कोरोनाचे भीषण संकट घोंगावत असल्याने पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली असून, सोमवारी दिवसभरात ‘ब्रेक द ...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६८ जणांविरुद्ध गुन्हा
अकोला : शहरासह जिल्हाभरात कोरोनाचे भीषण संकट घोंगावत असल्याने पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली असून, सोमवारी दिवसभरात ‘ब्रेक द चेन’चे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १६८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी विनामास्क फिरणारे, विनाकारण फिरणारे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून सुमारे ४३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यभर कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. अकोला शहरासह जिल्ह्यातही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत; मात्र तरीही काही नागरिक या निर्बंधांना न जुमानता विनाकारण बाहेर फिरत असल्याचे समोर आले. नागरिकांनी विनाकारण फिरण्याचा सपाटाच सुरू केला. मॉर्निंग वाक, इव्हिनिंग वाॅक करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर मास्क न वापरणाऱ्या ११६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४० वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अशाप्रकारे एकूण २०० पेक्षा अधिक जणांवर कारवाई करून सुमारे ४३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.