राज्यात होणार अडीच हजार महिला बचत गटांची निर्मिती
By Admin | Updated: January 17, 2015 00:27 IST2015-01-17T00:27:47+5:302015-01-17T00:27:47+5:30
अल्पसंख्याक महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचा पुढाकार.

राज्यात होणार अडीच हजार महिला बचत गटांची निर्मिती
वाशिम : अल्पसंख्याक समुदायातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्यावतीने २४00 बचत गट तयार केले जाणार आहेत. या बचत गटांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाकडून २७ कोटी ५४ लक्ष रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ शहरांमध्ये अल्पसंख्याक महिलांसाठी सुमारे २४00 बचत गटांची निर्मिती केली जाणार आहे. राज्य शासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ही योजना राबविली जाणार असून, यासाठी राज्य शासनाने १२ जानेवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार २७ कोटी ५४ लाख ३२ हजार ६३९ रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या माध्यमातून अल्पसंख्याक महिलांना संघटीत करून, पुरेसा पतपुरवठा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे.
* कौशल्य प्रशिक्षण
महिला बचत गटांसोबतच अल्पसंख्याकबहूल क्षेत्रातील महिलांमध्ये उद्योजकीय कौशल्य विकसीत करण्याच्या उद्देशाने त्यांना राज्य शासनाच्यावतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.
*पहिला टप्पा
राज्यातील अल्पसंख्याकबहूल क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पहिल्या टप्प्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड, मालेगाव, कारंजा, परभणी, पुणे, नागपूर, औरंगाबाद, भिवंडी, मुंब्रा-कौसा आणि मिरज या शहरामध्ये २४00 बचत गट निर्माण करून, त्यांचे १३ लोकसंचलित साधन केंद्र आठ वर्षाच्या कालावधीत उभे केले जाणार आहेत.