जुने शहरात दोन कुटुंबीयांमध्ये हाणामारी
By Admin | Updated: April 25, 2017 01:15 IST2017-04-25T01:15:33+5:302017-04-25T01:15:33+5:30
एका परिवाराविरुद्ध अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

जुने शहरात दोन कुटुंबीयांमध्ये हाणामारी
अकोला: शेजारच्या घरातून मांसाहाराची दुर्गंधी येत असल्याच्या कारणावरून जुने शहरातील दोन कुटुंबामध्ये सोमवारी सकाळी हाणामारी झाली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी परस्परांविरोधी तक्रारीवरून मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहे.
शिवचरणपेठ परिसरातील मानकेश्वर मंदिराजवळ राहणारे अतुल शेगोकार आणी गौतम जैन या दोन शेजाऱ्यांमध्ये मांसाहराच्या दूर्गंधीवरून वाद झाला. यासंदर्भात अभय जैन यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की शेगोकार यांच्या घरी दररोजच मांसाहारी प्रकारचे पदार्थ बनविण्यात येतात. या पदार्थांच्या दुर्गंधींचा त्रास गौतम नेमिचंद जैन यांच्या परिवाराला होतो. याबाबत जैन यांनी अतुल शेगोकार यांना विनंती करून हा प्रकार कमी करण्याची मागणी केली; मात्र याच कारणावरून अतुल शेगोकार व त्याच्या कुटुंबीयांनी सोमवारी सकाळी गौतम जैन, जयसागर नेमीचंद जैन, अभय छगनलाल जैन यांना मारहाण केली, तसेच जैन यांच्या घरातील साहित्याची फेकाफेक करीत त्यांना अश्लील शिवीगाळ केली. अभय जैन यांच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी अतुल शेगोकार, सरिता शेगोकार, अतुलची आई यांच्याविरोधात मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे. तर सरिता अतुल शेगोकार (३३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गौतम जैन, जयसागर जैन, अभय जैन या तिघांविरोधात मारहाणीसह अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याबाबत जैन परिवाराने आमच्या कुटुंबीयांचा काहीही दोष नसताना आमच्याविरोधात अॅट्रासिटी अॅक्टनुसारही गुन्हा दाखल करून वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला आहे.