प्रयोगशाळेच्या अहवालानंतर न्यायालयास देणार चित्रफीत

By Admin | Updated: July 17, 2015 01:58 IST2015-07-17T01:58:56+5:302015-07-17T01:58:56+5:30

युवकाचे लैंगिक शोषणप्रकरण; पोलिसांची भूमिका, जामीन अर्जावर आज निर्णय.

The court will give a report after the laboratory report | प्रयोगशाळेच्या अहवालानंतर न्यायालयास देणार चित्रफीत

प्रयोगशाळेच्या अहवालानंतर न्यायालयास देणार चित्रफीत

अकोला: युवकाच्या लैंगिक शोषण प्रकरणात जप्त केलेली अश्लिल चित्रफित प्रयोगशाळेकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली आहे. दोन ते तीन महिन्यानंतर प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो अहवाल आणि चित्रफित न्यायालयाकडे सादर केली जाईल, अशी भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी भारतीय सेवा सदनचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका आणि माजी सचिव जुगलकिशोर रूंगटा यांच्या अटकपूर्व जामीनावर शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहामध्ये रोजंदारीवर काम करणार्‍या पीडित युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून निरंजनकुमार गोयनका व जुगलकिशोर रूंगटा यांनी त्याचे लैंगिक शोषण केले. नोकरीत कायम केले जात नसल्याचे पाहून युवकाने आरोपींच्या अश्लिल चाळय़ांची चित्रफीत तयार केली. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. पीडित युवक आणि माजी मुख्याध्यापकासह चार साक्षीदारांचे जबाब नोंदवून, पोलिसांनी पीडित युवकाकडून अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत जप्त केली. दरम्यान, आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर या प्रकरण्याच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी सरकारी वकिलाकडे अश्लील छायाचित्र दिले; परंतु अश्लील चित्रफीत दिलीच नाही. यासंदर्भात सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र माळी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अश्लील चित्रफीत व छायाचित्रे तपासणीसाठी मुंबई येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविली असल्याचे सांगितले. आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांना जामीन मिळू नये, यासाठी पोलिसांचे म्हणणे न्यायालयात सादर केले आहे; मात्र न्यायालयाचा निर्णय अद्याप न आल्याने आरोपींना अटक करण्यात आली नसल्याची माहिती सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र माळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. न्यायालयाने आरोपींना जामीन नाकारल्यास त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा होईल आणि आम्ही तातडीने आरोपींना गजाआड करू, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The court will give a report after the laboratory report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.