फटाक्यांवर बंदीसाठी न्यायालयात धाव
By Admin | Updated: October 18, 2014 00:44 IST2014-10-18T00:44:34+5:302014-10-18T00:44:34+5:30
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल.

फटाक्यांवर बंदीसाठी न्यायालयात धाव
अकोला : संपूर्ण देशात फटाके उडविण्यावर बंदी आणावी, अशी मागणी पर्यावरण संरक्षण संदर्भातील जनहित याचिका सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्त्यांंनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे येथे दाखल केली आहे.
सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. रवींद्र भुसारी यांनी याचिकेतून फटाके उडविण्यासंदर्भात अनेक विषय मांडले आहेत. फटाक्यांमधून अनेक प्रकारचे विषारी वायू वातावरणात सोडले जातात आणि मोठय़ा प्रमाणात कागदी विषारी कचरा तयार होतो. फटाक्यांमध्ये असलेल्या ब्लॅक पावडर, कोळसा, सल्फर, पोटॅशियम नायट्रेट इत्यादींचे अत्यंत घातक मिश्रण समाविष्ट असते. त्यामुळे वातावरण प्रचंड प्रमाणात दूषित होते. फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, मानवी जीवन आणि पर्यावरणासाठी धोकादायक आहे. भारतामध्ये विस्फोटकासंबंधिचा कायदा १९८४ मध्ये अस्तित्वात आल्यावरही तब्बल २00८ साली या संदर्भातील नियम करण्यात आले आणि अजूनही कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही, असे याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे अँड. असीम सरोदे म्हणाले. यायिकाकर्त्यांंतर्फे अँड. असीम सरोदे, अँड. विकास शिंदे, अँड. स्मिता सिंगलकर, अँड. अल्का बबलानी, अँड. प्रताप विटणकर काम पाहत आहेत.
.. तर गुन्हे दाखल करा
* विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांंनी फटाके फोडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा
* दवाखाने, शाळा, धार्मिक, शांतता स्थळे या परिसरात फटाके फोडणार्यांवर कारवाई करा
* फटाक्यांची ध्वनी तीव्रता आणि त्यात वापरलेले घटक यांचा उल्लेख फटाक्यांवर नसेल तर संबंधित फटाके उत्पादक आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा
* निवासी व इतर भागांमध्ये सकाळी १0 ते ६ वाजेपर्यंत फटाके उडविण्यात येऊ नये