कापसाचा वेचा संपला, तुरीचा फुलोरा गळाला!
By Admin | Updated: November 29, 2014 22:34 IST2014-11-29T21:58:27+5:302014-11-29T22:34:38+5:30
व-हाडात दुष्काळाच्या झळा तीव्र.

कापसाचा वेचा संपला, तुरीचा फुलोरा गळाला!
अकोला: साधारणत: मार्च अखेरपर्यंत चालणारी कापसाची वेचणी यावर्षी डिसेंबरपूर्वीच जवळपास संपुष्टात आली असून, तुरीच्या फुलोरालाही गळती लागली आहे. यावर्षी पावसाचे आगमन लांबल्याने, मूग, उडीद आदी कमी कालावधीच्या पिकांचा फारसा पेराच झाला नाही, तर गत काही वर्षांपासून प्रमुख पीक म्हणून कापसाची जागा घेतलेल्या सोयाबीनची पावसाच्या लहरीपणामुळे पुरती धुळधाण झाली. या पृष्ठभूमीवर वर्हाडात दुष्काळाच्या झळा आतापासूनच तीव्र झाल्या आहेत.
वर्हाडात दर एक-दोन वषार्ंनंतर दुष्काळसदृश स्थिती निर्माण होत असल्याने या विभागातील सरासरी शेतमाल उत्पादन घटले आहे. यावर्षी पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस या नगदी पिकाला तर जबर फटका बसला आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कापसाचे उत्पादन घेतले जाते; पंरतु यावर्षी डिसेंबर महिना सुरू होण्यापूर्वीच, हजारो हेक्टरवरील कापसाचा वेचा संपला आहे आणि त्यातच तुरीच्या फुलोर्यालाही गळती लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
जमिनीतील ओलावा संपल्याने शेताला भेगा पडल्या आहेत. परिणामी शेतातील ओलावा पूर्णत: नष्ट झाला आहे. कोरडवाहू , हलक्या जमिनीतील कापसाच्या झाडांना तर दहा बोंडेसुध्दा शिल्लक नाहीत. शिल्लक दहा बोंडातील पाच बोंड्या वाळल्या असून, त्यांचे वाळलेल्या कवडयात रू पांतर झाले आहे. भारी काळ्या जमिनीतील बीटी कापसाच्या झाडांनादेखील दहापेक्षा जास्त बोेंड्या नसल्याचे चित्र आहे. थंडी व सकाळी पडणार्या दवामुळे ओलावा निर्माण होवून, कापसाची बोंडे फुलण्यास मदत होते; तथापि यावर्षी थंडी नाही आणि त्यामुळे दवदेखील पडत नसल्याने, कापूस उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. परिणामी कापसाची वेचणी यावर्षी नोव्हेंबरमध्यचे आटोपल्याचे चित्र आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांनी वर्हाडातील हे चित्र इतर प्रदेशापेक्षा भीषण असल्याचे म्हटले आहे. लोकमतशी बोलताना ते म्हणाले की त्यांनी वर्धा व यवतमाळ या दोन जिल्हय़ांचा स्वत: दौरा केला असून, त्या भागातील कापसाचे चित्र विदारक आहे. जमिनीतील ओलावा संपल्याने कापूस पीक शेवटची घटका मोजत असून, कापसाच्या शेतांची नोव्हेंबर महिन्यातच उलंगवाडी सुरू झाली आहे.