कापसाचा पेरा वाढणार !
By Admin | Updated: May 14, 2017 04:15 IST2017-05-14T04:15:57+5:302017-05-14T04:15:57+5:30
यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेत मशागतीच्या कामांना वेग आला

कापसाचा पेरा वाढणार !
अकोला : यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेत मशागतीच्या कामांना वेग आला असून, शेतकरी बियाण्यांचे नियोजन करण्यावर भर देत आहेत. कृषी विभागानेही पावसाच्या भाकितानुसार पीक नियोजन केले असून, विभागात कपाशीची पेरणी वाढेल, तर सोयाबीनचा पेरा दोन ते तीन टक्क्यांनी घटण्याचा अंदाज वर्तविला आहे.
मागच्या वर्षी अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत सोयाबीनची पेरणी १३ लाख ५0 हजार हेक्टरच्यावर झाली होती. उत्पादनही बर्यापैकी झाले; पण उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाले नाही, हमीदरापेक्षा कमी दराने शेतकर्यांना सोयाबीन विकावे लागले. याचा परिणाम यावर्षी सोयाबीन पेरणी कमी होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. कापसाला यावर्षी चांगले दर मिळाले आहेत. उताराही एकरी सरासरी ८ ते १२ क्विंटलपर्यंत लागला आहे.
त्यामुळे कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे नियोजनही कृषी विभागाने केले आहे. तूर पीक वाढीबाबत साशंकता आहे. कापूस आणि सोयाबीन पिकात शेतकरी तुरीची पेरणी करीत असतात. विभागातील एकूण खरिपाच्या ३२ लाख हेक्टरपैकी मागच्या वर्षी तुरीचे क्षेत्र पाच लाख हेक्टरपर्यंत पोहोचले होते; पण दरच मिळाले नसल्याने यावर्षी या पिकाबाबत शेतकरी य पिकाबाबात मागच्या वर्षीएवढे अनुकूल नसल्याचे चित्र आहे. पाऊस वेळेवर आला तर मात्र मूग, उडिदाची पेरणी मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यासाठीचे बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहेत; पण मागील वर्षी मूग ऐन फुलोर्यावर असताना पावसाचा खंड पडला होता. त्याचे प्रतिकूल परिणाम या पिकावर होऊन उत्पादनात घट झाली होती. मुगाचे दरही बाजारात बर्यापैकी असल्याने शेतकर्यांना वेळेवर पावसाची प्रतीक्षा आहे.
अकोला जिल्हय़ातील खरिपाचे क्षेत्र ४ लाख ८0 हजार हेक्टर आहे. यावर्षी जिल्हा कृषी विकास अधिकार्यांनी जिल्हय़ाचे नियोजन केले असून, यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्हय़ात यावर्षी बियाणे मुबलक आहेत.