महिलेच्या गर्भाशयात ठेवला कापसाचा बोळा
By Admin | Updated: June 13, 2014 18:48 IST2014-06-12T23:47:50+5:302014-06-13T18:48:23+5:30
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील परिचारिकेचा प्रताप

महिलेच्या गर्भाशयात ठेवला कापसाचा बोळा
पातूर: प्रसूतीदरम्यान महिलेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा ठेवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिचारिकेने केल्याचे उघडकीस आले आहे. पातूर येथील खासगी रुग्णालयात मंगळवार १० जून रोजी या महिलेच्या गर्भाशयातील कापसाचा बोळा काढण्यात आला.
वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील सिरसोली येथे राहणारी सुषमा संतोष माहुरे (२४) या महिलेस प्रसूतीसाठी अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेची १७ एप्रिल रोजी नॉर्मल प्रसूती होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले. प्रसूतीदरम्यान रुग्णालयातील परिचारिकेने सदर महिलेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा ठेवला. ही महिला प्रसूतीनंतर पातूर येथे माहेरी आली; परंतु लागलीच तिच्या पोटात वेदना सुरू झाल्या आणि अंगावरील स्त्रावही वाढला. तब्बल दोन ते अडीच महिने वेदना सहन करणार्या या महिलेस तिच्या आईने पातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तपासणी केल्यानंतर तिच्या गर्भाशयात कापसाचा बोळा असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी लगेचच तो कापसाचा बोळा काढल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. जिल्हा स्त्री रुग्णालयात हा प्रकार घडल्याने या रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.