कापसाचे दर प्रतिक्विंटल पाच हजार होण्याची शक्यता!
By Admin | Updated: April 20, 2015 01:43 IST2015-04-20T01:43:58+5:302015-04-20T01:43:58+5:30
शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद.

कापसाचे दर प्रतिक्विंटल पाच हजार होण्याची शक्यता!
अकोला : खासगी बाजारात कापसाचे दर वाढत असून, हे दर प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यन, शेतकर्यांजवळील कापूस संपल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्रंही बंद करण्यात आली आहेत. राज्यात आतापर्यंत ७0 लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे. यावर्षी कापूस खरेदी केंद्र लवकर सुरू न झाल्याने आर्थिक गरजेपोटी सुरुवातीला अल्पभूधारक शेतकर्यांनी व्यापार्यांना कापूस विकला आहे. राज्यात आतापर्यंत ७0 लाख गाठी कापूस शेतकर्यांनी विकला असून, यातील ८0 लाख क्विंटल, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी केला आहे आणि तेवढाच कापूस व्यापार्यांनी खरेदी केला आहे. कापूस उत्पादक पणन महासंघाने यावर्षी २८ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. एप्रिल महिना लागताच कापसाचे दर वाढले असून, सध्या बाजारात ४,६५0 ते ४,७00 रुपये प्रतिक्विंटल दर सुरू आहेत. या महिन्यातच यामध्ये आणखी वृद्धी होण्याची शक्यता व्यापारी वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने यावर्षी कापसाचे हमी दर ४0५0 ते ३९५0 प्रतिक्विंटल जाहीर केले होते. तथापि महाराष्ट्रातील शेतकर्यांना प्रतवारीचे निकष लावून ३८00 ते ३९00 रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणे भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळ आणि महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने शेतकर्यांकडून कापूस खरेदी केला आहे. खासगी बाजारात याच कापसाला आता ४७00 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत. आता तर शेतकर्यांजवळील कापूस जवळपास संपत आला आहे. काही मोजक्याच सधन शेतकर्यांकडे कापूस असण्याची शक्यता आहे. दरम्यान, कापूस उत्पादक पणन महासंघाने खरेदी पूर्णत: बंद केली आहे. भारतीय कापूस महामंडळाने मात्र कापूस खरेदीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. बाजारातील कापसाचे दर कमी झाल्यास हमी दराने सीसीआय कापूस खरेदी करण्यास तयार असल्याचे वृत्त आहे.