नगरसेवकाचे उपोषण अखेर मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:13 IST2021-02-05T06:13:49+5:302021-02-05T06:13:49+5:30
झोपडीला आग; ५० हजारांचे नुकसान मूर्तिजापूर: जुन्या दर्यापूर रोडजवळील झोपडीला साेमवारी अचानक आग लागली. या आगीत ५० हजारांचे नुकसान ...

नगरसेवकाचे उपोषण अखेर मागे
झोपडीला आग; ५० हजारांचे नुकसान
मूर्तिजापूर: जुन्या दर्यापूर रोडजवळील झोपडीला साेमवारी अचानक आग लागली. या आगीत ५० हजारांचे नुकसान झाले. सागर खत्री यांच्या झोपडीस आग लागल्याने, घरातील रोख ३० हजार व घरगुती साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम
आगर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३१ जानेवारी रोजी सकाळी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. जि.प. सदस्य वेणूताई डाबेराव यांनी पोलिओ डोस पाजून शुभारंभ केला. यावेळी वैद्यकीय अधिकारी चोरे, पं.स. सदस्य भास्कर अंभोरे, अशफाक हुसैन, उषा राऊत, कार्तिक काकडे, के.बी. पांडे, मंदा सिरसाट, धीरज बामटेक उपस्थित होते.
अमोल काळपांडे यांचा सत्कार
पातूर: एका विद्यार्थ्याचे शैक्षणिक कागदपत्रे पातूर येथील अमोल काळपांडे याला सापडले. त्याने ही कागदपत्रे पातूर पोलीस ठाण्यात सोमवारी जमा केली. स्वप्नील पवार या विद्यार्थ्यास पोलिसांनी संपर्क करून ही कागदपत्रे त्याच्या स्वाधीन केली. ठाणेदार राऊत, रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संघटक आकाश हिवराळे यांनी अमोल काळपांडे याचा सत्कार केला.
कापशी येथील जुगारावर पोलिसांचा छापा
चिखलगाव: पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापशी येथील जुगारावर विशेष पथकाने सोमवारी सायंकाळी छापा घालून देवीदास कोकाटे, अशोक अवचार, मंगेश उंबरकर यांना अटक केली. त्यांच्याकडून ४ हजार २१० रूपये जप्त केले. पातूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रेतीची वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई
बाळापूर: रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर दहशतवाद विरोधी पथकाने रविवारी कारवाई केली. रेतीने भरलेल्या तीन टिप्परची वाहतूक होत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करून ६ ब्रास रेती जप्त केली व पुढील कारवाईसाठी तहसीलदार बाळापूर यांच्याकडे प्रकरण सोपविले.
तिघा जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल
बाळापूर: वीज तारांवर थेट आकोडे टाकून वीज चोरी करणाऱ्या पातूर तालुक्यातील तिघा जणांविरुद्ध बाळापूर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. महावितरणचे कनिष्ठ अभियंता गौरव शेलुकर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आनंदा शिवराम दुतोंडे, देऊळगाव येथील सुभाष महादेव खराटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
स्मशानभूमी परिसरात पथदिवे लावण्याची मागणी
कुरूम: येथील स्मशानभूमी परिसरात पथदिवे नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते. रात्रीच्या अंत्यसंस्कारवेळी अंधारातून अंत्ययात्रा काढावी लागते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने स्मशानभूमी परिसरात पथदिवे लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
थंडी वाढल्याने, आजार बळावलेे
पिंजर: परिसरात अचानक वातावरणात बदल झाला आहे. थंडीही वाढली असल्याने, आजार बळावले आहेत. थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप, दमा आजाराने डोके वर काढले आहे. थंडीचा आरोग्यावर परिणाम होत आहे. सध्या दवाखान्यांमध्येसुद्धा रुग्णांची गर्दी वाढली आहे.
धुक्यामुळे हरभरा पिकाला फटका
मुंडगाव: गत काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. धुके पडत आहे. पहाटेला पडणाऱ्या धुक्यामुळे हरभरा पिकाला फटका बसत आहे. धुक्यामुळे हरभरा पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. बोंडअळी व तुरीच्या कमी उत्पादनामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच आता हरभरा पिकाला धुक्याचा फटका बसत आहे.
कॅनॉलच्या पाण्यामुळे गहू पिकाला संजीवनी
बोरगाव मंजू: परिसरातील दहीगाव, धोतर्डी, सांगळूद, वाकी, पळसो बढे आदी गावांमध्ये कॅनॉलचे पाणी सोडण्यात येत असल्याने, गहू पिकाला संजीवनी मिळाली आहे. पाण्यामुळे गव्हाचे पीक चांगले बहरले आहे. गव्हाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्याने, शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
हगणदरी गावे केवळ कागदावरच
बार्शीटाकळी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये उघड्यावर शौचास जाण्याचे चित्र सर्रास दिसून येते. जिल्हा परिषदेने अनेक गावे हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित केले, तसेच या गावांमध्ये हगणदरीमुक्त गाव असे फलकसुद्धा लावले; परंतु प्रत्यक्षात गावांमधील लोक उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र आहे.