नगरसेवक ते आमदार

By Admin | Updated: October 25, 2014 01:07 IST2014-10-25T00:52:06+5:302014-10-25T01:07:04+5:30

व्यापार करता-करता गोवर्धन शर्मा झाले राजकारणी

Corporator to MLA | नगरसेवक ते आमदार

नगरसेवक ते आमदार

डॉ. किरण वाघमारे / अकोला
अकोला पश्‍चिममधून पाचव्यांदा विजय मिळविणारे भाजपचे गोवर्धन शर्मा ऊर्फ लालाजी हे उच्चशिक्षित आहेत. बी.कॉम. पर्यंंत शिक्षण झालेल्या गोवर्धन शर्मा यांचा व्यवसाय आहे. न्यू क्लॉथ मार्केटमध्ये त्यांचे कपड्याचे दुकान असून आपला परंपरागत व्यवसाय सांभाळून त्यांनी नगरसेवक ते आमदारपर्यंतचा प्रवास केला आहे.
गोवर्धन शर्मा महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते. वडील मांगीलाल शर्मा यांच्या माध्यमातून त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेत. नंतर ते संघाच्या शाखेत दाखल झाले. संघ स्वयंसेवक म्हणून त्यांनी उत्तम भूमिका बजावली आहे. त्यांचे वडील मांगीलाल शर्मा हे जनसंघाचे कार्यकर्ते होते. वडील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून गोवर्धन शर्मा यांची जडण-घडण झाली.
महाविद्यालयातील जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गोवर्धन शर्मा यांनी आपले नेतृत्व गुण प्रकट केले. विद्यार्थ्यांंना संघटित करून त्यांच्यात राष्ट्र प्रेमाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न लालाजी करीत असत. सगळ्यांना आपलेसे करण्याची कला त्यांच्यात ठासून भरली होती. जाती-धर्माचा भेद न करता ते विद्यार्थ्यांंना एकात्मतेच्या धाग्यात जोडण्याचे काम करीत असत. हेच गुण पुढे त्यांना राजकारणात कामी आले.
वडिलांच्या निधनानंतर १९८0 मध्ये लालाजी राजकारणात आले. सुरुवातीपासूनच संघाचे संस्कार असल्यामुळे लालाजींनी जनसंघात प्रवेश केला. सुरुवातीला लालाजी जुने शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात राहत होते. मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी होत असत. यातूनच त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले. पुढे ते हा भाग सोडून आळशी प्लॉट परिसरात राहण्यास आले. याच वर्षी त्यांनी आळशी प्लॉट येथून विठ्ठल मंदिर असलेल्या वार्डामधून निवडणूक लढविली आणि त्यांनी ही निवडणूक जिंकली.
गोवर्धन शर्मा यांनी भाजपात प्रवेश केला व भाजपात संघटनेंतर्गत विविध पदे त्यांनी भूषविली. १९८५ ते १९९५ या काळात शर्मा हे नगरसेवक होते.
१९९५ मध्ये नगरसेवक असतानाच गोवर्धन शर्मा यांनी अकोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि पहिल्याच प्रयत्नात जिंकली. त्यानंतर १९९५ पासून ते सातत्याने अकोला पश्‍चिम मतदारसंघातून विजयी होत आहेत. युती शासनाच्या काळात पशुसंवर्धन खात्याचे राज्यमंत्री म्हणूनदेखील गोवर्धन शर्मा यांनी भूमिका बजावली. पक्ष देईल ती जबाबदारी लालाजींनी पार पाडली. कुठलाही गट-तट न बाळगता त्यांनी सर्वांना सोबत घेऊन व सर्वांंचा सल्ला ऐकत काम केले. मंत्रिपद त्यांना फारसे मानवले नाही. त्यांनी राजीनामा दिला व ते आमदार म्हणून कार्यरत राहिले. उत्कृष्ट कबड्डीपटू असलेले गोवर्धन शर्मा हे पक्षांतर्गत विरोधक व इतर पक्षांच्या विरोधकांना मात देण्यात सातत्याने यशस्वी ठरले आहेत.

Web Title: Corporator to MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.