मनपा प्रशासनाने व्यावसायिकांना बजावला १ लाखाचा दंड
By Admin | Updated: July 21, 2015 01:11 IST2015-07-21T01:11:03+5:302015-07-21T01:11:03+5:30
हॉटेल व्यावसायिकांची महापौर, जिल्हाधिका-यांकडे धाव

मनपा प्रशासनाने व्यावसायिकांना बजावला १ लाखाचा दंड
अकोला : हॉटेलमध्ये अपेक्षित साफसफाई आढळल्यानंतर सर्व्हिस लाईनमध्ये अस्वच्छता पसरविल्याची सबब पुढे करीत महापालिकेच्या प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी सोमवारी राठी पेडेवाला या प्रतिष्ठानच्या मालकाला तब्बल १ लाख रुपये तर गुजराथी उपाहारगृहाच्या संचालकांना ४0 हजार रुपयांचा दंड आकारला. जोपर्यंत धनादेश मिळत नाही, तोपर्यंत हॉटेलमधून बाहेर निघणार नसल्याचा धमकीवजा इशारा मडावींनी दिल्यानंतर धनादेश दिल्याचे राठी पेडेवालाच्या संचालकांनी सांगितले. याप्रकरणी संतप्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांनी महापौरांसह जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन प्रशासनाच्या हिटलरशाहीचा पाढा वाचला. मनपाच्या गंगाजळीत वाढ करण्याच्या नावाखाली तत्कालीन उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शहरातील खाद्यपेय विक्रेता, हॉटेल व्यावसायिक यांच्या प्रतिष्ठानांची तपासणी करीत एक-एक लाख रुपये दंड आकारण्याची मोहीम सुरू केली होती. अतिक्रमणाच्या नावाखाली हॉटेलमधील खाद्यपदार्थांची चक्क रस्त्यावर फेकफाक करण्यापर्यंत चिंचोलीकरांनी मजल गाठली होती. यामुळे चिंचोलीकर यांना अकोलेकरांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला होता. नेमका तसाच प्रकार प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी सुरू केल्याचे समोर आले आहे. हॉटेलमध्ये अपेक्षित साफसफाई आढळल्यानंतर हॉटेलमुळे सर्व्हिस लाईनमध्ये अस्वच्छता परसरल्याची सबब पुढे करीत मडावी यांनी राठी पेडेवालाचे संचालक श्रीकृष्णकुमार राठी यांना तब्बल १ लाख रुपयाचा दंड आकारला. रतनलाल प्लॉटस्थित गुजराथी उपाहारगृहाचे संचालक दिनेश मेहता यांना हॉटेलमधील अस्वच्छताप्रकरणी ४0 हजारांचा दंड आकारला. जोपर्यंत दंडाच्या रकमेचा धनादेश मिळत नाही, तोपर्यंंत हॉटेलमधून बाहेर निघणार नसल्याचा इशारा मडावी यांनी दिला. त्यामुळे धनादेश दिल्याचे राठी यांनी सांगितले. याप्रकरणी अकोला जिल्हा सर्व खाद्यपेय विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल,सचिव दीपक वोरा यांच्यासह असंख्य व्यावसायिकांनी महापौर उज्ज्वला देशमुख, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. याविषयी मडावी यांना संपर्क साधला असता,त्यांनी प्रतिसाद दिला नाही.