CoronaVirus: Situation in Akola out of control due to lack of coordination! | CoronaVirus : समन्वयाच्या अभावाने अकोला शहरातील परिस्थिती हाताबाहेर!

CoronaVirus : समन्वयाच्या अभावाने अकोला शहरातील परिस्थिती हाताबाहेर!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात प्रशासनातील संबंधित यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाने अकोला शहरातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असा सूर गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीत उमटला.
अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींसह सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या कामात प्रशासनातील आरोग्य विभाग, महानगरपालिका, पोलीस विभाग इत्यादी यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने शहरातील परिस्थिती बिघडली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याच्या सूचनाही या बैठकीत लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ शर्मा, जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर, नगरसेवक तुषार भिरड, मनसेचे पंकज साबळे, सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


लोकप्रतिनिधींच्या सूचना प्रशासनाकडून ऐकल्या जात नाहीत. अकोला शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन, प्रशासनामार्फत उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.
-गोवर्धन शर्मा, आमदार.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसेच प्रशासनातील संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम केले पाहिजे.
-नितीन देशमुख, आमदार.


रुग्णालयात रुग्णांची सोय चांगली होते, असा संदेश लोकांमध्ये गेल्यास, नागरिक स्वत:हून तपासणीसाठी पुढे येतील. तसेच अकोला शहरात प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये राज्य राखीव दल व केंद्रीय राखीव पोलीस दलाचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला पाहिजे.
-रणधीर सावरकर,
आमदार.

अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शहरात पंधरा दिवस कडकडीत ‘लॉकडाउन’ पाळला पाहिजे. शहराच्या सीमा बंद करून, कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रशसनातील संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. तसेच नगरसेवक व स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आहे.
-अमोल मिटकरी, आमदार.


अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर विशेष भर देण्याची गरज आहे.
-डॉ. रणजित पाटील,
आमदार.


मृत्यूदरात वाढ होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. वाढता संसर्ग रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले असून, अकोल्यात ‘लॉकडाउन’ आहे, असे वाटतच नाही. त्यामुळे संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागरिक घरातच कसे राहतील, यासंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
-गोपीकिशन बाजोरिया, आमदार.

जल्ह्यात येणाºया व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात येत नाही. गावा-गावांत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यास नियंत्रणात येणार नाही; यासंदर्भात प्रशासनाकडून उपाययोजना होत नाहीत. संसर्ग रोखण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.
-प्रतिभा भोजने,
अध्यक्ष, जिल्हा परिषद.

अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी आरोग्य तपासणी पूर्ण करण्याची गरज असून, पोलिसांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या मागविण्यात आल्या पाहिजे.
-विजय अग्रवाल, माजी महापौर तथा नगरसेवक.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोणतीही व्यवस्था नाही.शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या नाही, तर भयानक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
-बबनराव चौधरी, माजी आमदार तथा महानगराध्यक्ष, काँग्रेस.

संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. शहरातील प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
-जितेंद्र पापळकर,
जिल्हाधिकारी.

 

Web Title: CoronaVirus: Situation in Akola out of control due to lack of coordination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.