CoronaVirus: Five 'Containment Zones' open in Akola | CoronaVirus : अकोला शहरातील पाच ‘कंटेनमेन्ट झोन’ खुले

CoronaVirus : अकोला शहरातील पाच ‘कंटेनमेन्ट झोन’ खुले

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिका प्रशासनाने तब्बल ११४ ‘कंटेनमेन्ट झोन’ तयार केले होते. यापैकी रविवारी पाच ‘कंटेनमेन्ट झोन’ खुले करण्यात आले आहेत. संबंधित पाचही ‘कंटेनमेन्ट झोन’मध्ये गत २२ दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नसल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना वारंवार ‘फिजिकल डिस्टन्सिंग’च्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले होते. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात न येणे, तोंडाला रुमाल किंवा मास्क लावणे, अनावश्यक कामासाठी किराणा किंवा भाजी बाजारात गर्दी न करण्याची सूचना अकोलेकरांना वारंवार करण्यात आली होती. या सर्व सूचनांकडे सपशेल दुर्लक्ष करीत अकोलेकर भाजी बाजारात तसेच किराणा दुकानांमध्ये गर्दी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या सर्व बाबींचे परिणाम आता समोर येत आहेत. कोरोना विषाणूचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक ११ येथील बैदपुरा, मोमीनपुरा, मोहम्मद अली रोड परिसर, ताजनापेठ, फतेह अली चौक, कलाल की चाळ, माळीपुरा, गवळीपुरा आदी दाट लोकवस्तीच्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. यादरम्यान, पूर्व झोन तसेच पश्चिम झोनमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उत्तर झोन वगळता शहराच्या इतर भागात रुग्णांची वाढत असलेली संख्या महापालिकेच्या चिंतेत भर घालणारी ठरत असतानाच रविवारी मात्र मनपा प्रशासनाला काहीअंशी दिलासा मिळाला आहे. शहरातील चारही झोनमधील एकूण पाच ‘कंटेनमेन्ट झोन’मध्ये गत २२ दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे निकषानुसार संबंधित ‘कंटेनमेन्ट झोन’ स्थानिक रहिवाशांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या ‘कंटेनमेन्ट झोन’चा आहे समावेश

  • पूर्व झोन-शिवर
  • पश्चिम झोन- जय हिंद चौक
  • उत्तर झोन- शंकर नगर (अकोट फैल)
  • दक्षिण झोन- सिंधी कॅम्प पक्की खोली, शिवणी


कोरोना विषाणूची लागण टाळण्यासाठी अकोलेकरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे भाग आहे. तरच कोरोनापासून दूर राहता येईल.
- संजय कापडणीस,
आयुक्त, मनपा.

Web Title: CoronaVirus: Five 'Containment Zones' open in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.