CoronaVirus: 'Covid Care App' Created by Doctors for Awareness | CoronaVirus: जनजागृतीसाठी डॉक्टरांनी बनविले ‘कोविड केअर अ‍ॅप’

CoronaVirus: जनजागृतीसाठी डॉक्टरांनी बनविले ‘कोविड केअर अ‍ॅप’

अकोला : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्याचसोबत कोरोनाविषयी चुकीच्या गोष्टीही पसरत आहेत. या अफवांना आळा बसविण्यासोबतच लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने अकोल्यातील काही डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी मिळून ‘कोविड केअर अ‍ॅप’ची निर्मिती केली आहे. ज्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती तर होईलच, शिवाय लोकांना पडणाऱ्या प्रश्नांचीही उत्तरे या माध्यमातून दिली जाणार आहेत.
कोरोना ज्या वेगात जगभरात पसरला, त्याच्या दुप्पट वेगाने या आजाराबद्दलच्या अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक शंका, प्रश्न निर्माण झाले आहेत. या शंकांचे निराकरण करण्यासाठी अकोल्यातील काही डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी शक्कल लढवत ‘कोविड केअर अ‍ॅप’ची निर्मिती केली. या अ‍ॅपच्या माध्यमातून कोरोनाबद्दल आपल्या मनातील विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कालपासून मला कनकन वाटतंय, मला कोरोना झाला असेल का? सोशल मीडियावरील संदेशात सांगितलेल्या उपचारांमुळे कोरोना बरा होईल का? कोरोना हा विषाणू नक्की असतो कसा? कोरोना विषाणू शरीरात गेल्यावर नक्की आजार कसा निर्माण करतो? कोरोना संबंधित आपल्या अशाच सर्व शंका, प्रश्न सोडवून त्याबद्दल इत्यंभूत व शास्त्रोक्त माहिती या अ‍ॅपच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न हे डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थी करणार आहेत. हे अ‍ॅप डॉ. अंकित तायडे, डॉ. दर्पण कांकरिया, डॉ. स्नेहा केसवानी, डॉ. जिगीश नगरारे यांनी तयार संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना त्यांचे मित्र अभियंता तुषार खंडारे, राहुल घुबडे यांनी मदत केली आहे.


अ‍ॅप लवकरच येणार प्ले स्टोअरवर
‘कोविड केअर अ‍ॅप’ तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, प्ले स्टोअरकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. तायडे यांनी दिली. हे अ‍ॅप लवकरच सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार असून, जनजागृतीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याची आशादेखील डॉ. तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

 

Web Title: CoronaVirus: 'Covid Care App' Created by Doctors for Awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.