CoronaVirus in Akola : आणखी दोन पॉझिटिव्ह; अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ५७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 10:45 IST2020-05-06T10:45:07+5:302020-05-06T10:45:29+5:30
दोन्ही रुग्ण महिला असून त्यातील एक ताजनगर येथील तर अन्य एक राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहे.

CoronaVirus in Akola : आणखी दोन पॉझिटिव्ह; अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ५७ वर
अकोला : कोविड-१९ आजाराचा हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोला शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, बुधवार, ६ मे रोजी यामध्ये आणखी दोन रुग्णांची भर पडली. बुधवारी आणखी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेले दोन्ही रुग्ण महिला असून त्यातील एक ताजनगर येथील तर अन्य एक राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रेड झोनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ५ मे रोजी कोरोनाचे ११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून रुग्णांची एकून संख्या ७५ झाली होती. यामध्ये मंगळवारी आणखी दोघांची भर पडली. आज रोजी जिल्ह्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ५७, तर एकून रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. जिल्ह्यातील एकून १३ जण कोरोनामुक्त झाले असून, सहा जणांचा कोविड-१९ आजाराने मृत्यू झाला आहे. तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. बुधवारी, एकून ३१ अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी दोन पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९ अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.