Coronavirus in Akola : दिवसभरात नऊ पॉझिटिव्ह; पाच कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:06 IST2020-05-12T19:05:31+5:302020-05-12T19:06:49+5:30
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६८ झाली आहे.

Coronavirus in Akola : दिवसभरात नऊ पॉझिटिव्ह; पाच कोरोनामुक्त
अकोला : शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला ‘ब्रेक’ लागण्याची कोणतीही चिन्हे नसून, मंगळवार, १२ मे रोजी दिवसभरात यामध्ये आणखी नऊ रुग्णांची भर पडली. दिवसभरात दिड वर्षीय बालकासह एकूण नऊ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६८ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी पाच जणांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सायंकाळी सांगण्यात आले.
मंगळवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून दिवसभरात प्राप्त झालेल्या ८१ अहवालात ७२ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुणांपैकी आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक दीड वषार्चा बालक ,एक आठ वषार्चा मुलगा, एक ६२ वर्षीय इसम तर एक २३ वर्षीय महिला असून हे सर्व जण भवानी पेठ तारफैल या भागातील रहिवासी आहे. तर आज सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या पाच रुग्णांपैकी तीन महिला व दोघे पुरुष आहेत.ते खैर मोहम्मद प्लॉट, भीमनगर व तिघेजण गवळीपूरा या भागातील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
पाच जणांना रुग्णालयातून सुटी
दरम्यान आज सायंकाळी पाच जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.त्यातील चौघे कलाल की चाळ व एक फतेह चौक येथील रहिवासी आहेत. हे पाचही जण दि.२८ एप्रिल रोजी दाखल झाले होते. आज पुर्ण बरे होऊन व त्यांचे सर्व अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला व सायंकाळी डिस्चार्ज करुन निरोप देण्यात आला.
१३५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत १६८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १४ जण (एक आत्महत्या व १३ कोरोनामुळे) मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना, बुधवार दि.६ मे रोजी एकास व आज (मंगळवार दि.१२ मे) पाच जणांना असे १९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.