CoronaVirus in Akola : आणखी एक पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १५४ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 17:28 IST2020-05-10T17:27:28+5:302020-05-10T17:28:44+5:30
शहरातीन फतेह चौक भागातील २४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आले.

CoronaVirus in Akola : आणखी एक पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १५४ वर
अकोला : अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, रविवार, १० मे रोजी सायंकाळी आणखी एका संदिग्ध रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकून रुग्णांची संख्या १५४ वर पोहचली आहे. शहरातीन फतेह चौक भागातील २४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आले.
रविवारी दिसभरात सकाळी सहा, तर सायंकाळी एक असे एकूण सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रविवारी सकाळी एका कोरोनाबाधित ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून १३ झाली आहे. मयत महिला ही खैर मोहम्मद प्लॉट भागातील रहिवासी असून, तीला गुरुवार, ७ मे रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
रविवारी दिवसभरात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून, ते मोहम्मद अली रोड, रामनगर सिव्हिल लाईन्स, तारफैल भवानी पेठ, दगडीपूल जुने शहर, गवळीपूरा व फतेह चौक येथील रहिवासी आहेत.
रेड झोनमध्ये समावेश झालेल्या अकोला शहरात आठवडाभरापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत असतानाही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. रविवार, १० मे रोजी एकूण १७२ अहवाल प्राप्त झाले असून, सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १६५ अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १३ जणांचा मृत्यू (१२ कोविड-१९ आजाराने नैसर्गिक मृत्यू व एक आत्महत्या) झाला आहे. तर १४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत १२७ पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.