CoronaVirus in Akola : ४०५ चाचण्या; १७ जण पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:12 IST2020-08-21T11:12:43+5:302020-08-21T11:12:51+5:30
यामध्ये १४ पॉझिटिव्ह अहवाल आरटीपीसीआर, तर ३ रॅपिड अॅन्टिजन टेस्टचे आहेत.

CoronaVirus in Akola : ४०५ चाचण्या; १७ जण पॉझिटिव्ह!
अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. गुरुवारी दिवसभरात ४०५ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये १४ पॉझिटिव्ह अहवाल आरटीपीसीआर, तर ३ रॅपिड अॅन्टिजन टेस्टचे आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गत २० दिवसांत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागातर्फे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. गुरुवारी आरटीपीसीआर आणि रॅपिड अॅन्टिजन टेस्ट मिळून ४०५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालामध्ये पॉझिटिव्ह आलेल्या १४ रुग्णांमध्ये सिव्हिल लाइन येथील दोन जण तर उर्वरित बाळापूर नाका, जीएमसी क्वॉटर व सस्ती ता. पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व सात पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर येथील दोन जण तर उर्वरित हरिहर पेठ, तोष्णीवाल लेआउट, चांगेफळ अकोला, तेल्हारा, बाभूळगाव ता. पातूर, पिंजर ता. बार्शीटाकळी, पोपटखेड ता. अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३,३५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यापैकी २,८८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
६३ रुग्णांना डिस्चार्ज
रुग्णसंख्या वाढीसोबतच कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण लक्षणीय आहे. गुरुवारी ६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आले. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २६ जणांना, कोविड केअर सेंटर येथून २० जण, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून ११ जण, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन जण, हॉटेल रणजित येथून दोन जण, तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून एक, असे एकूण ६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.