CoronaVirus in Akola : दिवसभरात ३० पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू; ३४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:46 IST2020-08-21T19:45:58+5:302020-08-21T19:46:15+5:30
दिवसभरात ३० नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३३८८ वर गेली आहे.

CoronaVirus in Akola : दिवसभरात ३० पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू; ३४ कोरोनामुक्त
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शुक्रवार, २१ आॅगस्ट रोजी अकोला शहर व म्हैसपूर या गावातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४३ वर पोहचला आहे. दिवसभरात ३० नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३३८८ वर गेली आहे. दरम्यान, ३४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे २६७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३० जण पॉझिटिव्ह असून, तब्बल २३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ३० जणांमध्ये १३ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये वाडेगाव येथील १० जणांसह आपातापा व जूने शहर येथील प्रत्येकी तीन जण, व्याळा, मुर्तिजापूर, खदान येथील प्रत्येकी दोन जण, नेहरु पार्क, लक्ष्मी नगर, कापशी,लोहारा, नकाशी, जीएमसी, डाबकी रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
दोघांचा मृत्यू
कोरोनाने शुक्रवारी आणखी दोघांचा बळी घेतला. यापैकी एक रुग्ण हा अकोला शहरातील बाळापूर नाका परिसरातील ७४ वर्षीय पुरुष असून, त्यांना १९ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. बार्शीटाकळी तालुक्यातील म्हैसपूर येथील ४२ वर्षीय महिलेचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेस १७ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.
३४ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, कोविड केअर सेंटर येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून ११, हॉटेल रिजेन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून एक, कोविड केअर सेंटर, बाळापूर येथून एक, तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून एक अशा एकूण ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३३१ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३८८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २९१४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.