CoronaVirus in Akola : दिवसभरात १४ रुग्ण वाढले; १७ बरे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 18:14 IST2020-06-05T18:12:14+5:302020-06-05T18:14:37+5:30
कोरोना बाधितांचा एकूण आकडा ७२६ वर पोहोचला आहे.

CoronaVirus in Akola : दिवसभरात १४ रुग्ण वाढले; १७ बरे झाले
अकोला : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असून, शुक्रवारी ५ जून रोजी आणखी १४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा एकूण आकडा ७२६ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी सकाळी पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा २०४ वर पोहोचला होता. मात्र, सायंकाळी १७ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८७ वर आली.
कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा हा फैलाव झपाट्याने वाढत आहे. परिणामी अकोला विदर्भातील ‘हॉटस्पॉट’ ठरला असून, सद्यस्थितीत विदर्भात सर्वाधिक रुग्णांची नोंद अकोल्यात करण्यात आली आहे. शुक्रवारी त्यात आणखी १४ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ७२६ वर पोहोचला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी २८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४ अहवाल निगेटिव्ह आहेत. शुक्रवारी सकाळी प्राप्त अहवालात सात महिला व सात पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये दोन जण गुलजारपुरा, दोन सिंधी कॅम्प,दोन हैदरपुरा तर उर्वरित गोरक्षण, गवळीपूरा, पातूर, बिर्ला कॉलनी, अकोट फैल, बैदपुरा, जुने शहर, मोहतामिल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही. मात्र, १७ जणांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये सात जणांना घरी सोडण्यात आले, तर १० जणांना संस्थागत अलगीकरणात वैद्यकीय निरीक्षणात ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२६ झाली आहे. सद्यस्थितीत १८७ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
आतापर्यंत ५०५ जणांना डिस्चार्ज
गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनासह अकोलेकरांचीही चिंता वाढली आहे. मात्र, दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही त्याच वेगाने वाढत असल्याने अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत ५०५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.